पब्जी खेळातील वादातून तरुणाची हत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पब्जी खेळातील वादातून तरुणाची हत्या
पब्जी खेळातील वादातून तरुणाची हत्या

पब्जी खेळातील वादातून तरुणाची हत्या

sakal_logo
By

ठाणे, ता. १ : वर्तकनगर भागात मोबाईलवर ‘पब्जी’ खेळताना झालेल्या वादातून २२ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. ही खळबळजनक घटना सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली असून याप्रकरणी एकास अटक; तर दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ठाण्यातील वर्तकनगर येथील जानकीदेवी चाळीत राहणाऱ्या साहिल जाधव (वय २२) यासोबत प्रणव माळी (वय १९) व इतर दोघांची ओळख झाली होती. साहिल, प्रणव आणि इतर दोन अल्पवयीन मुले मोबाईलमध्ये ‘पब्जी’ खेळत असत. प्रणव आणि त्याचे अल्पवयीन साथीदार यांचा एक गट; तर साहिलही त्याचा दुसरा गट तयार करून पब्जीमध्ये खेळत होते. यातील एक गट हा दुसऱ्या गटावर खेळत हल्ला करून हरवत होता. काही दिवसांपूर्वीच खेळातील वादावरून साहिल आणि आरोपींमध्ये हाणामारीचा प्रकार घडला होता. याच कारणावरून सोमवारी रात्री प्रणव आणि दोन्ही अल्पवयीन मुले चाकू घेऊन साहिलच्या घराजवळ आले. या तिघांनी त्याच्यासोबत ‘पब्जी’तील खेळण्यावरून वाद घालण्यास सुरुवात केली. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाल्यानंतर तिघांनी साहिलवर चाकूने वार केले. या हल्ल्यात साहिल गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी साहिलच्या आईने वर्तकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी प्रणवला अटक केली; तर दोघा अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोघांवर कठोर कारवाईची तयारी पोलिसांकडून सुरू आहे.

दोन महिन्यांपूर्वी पब्जी खेळावरून दोन गटांत वाद झाले होते. याच कारणावरून साहिलची हत्या करण्यात आली. यापूर्वीदेखील या खेळावरून जीव गेले आहेत. त्यामुळे पालकांनी आपला पाल्य काय करतो, याबाबत सजग असले पाहिजे.
- बाळासाहेब पाटील, पोलिस उपायुक्त.