जेएनपीटीमध्ये विक्रमी माल हाताळणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जेएनपीटीमध्ये विक्रमी माल हाताळणी
जेएनपीटीमध्ये विक्रमी माल हाताळणी

जेएनपीटीमध्ये विक्रमी माल हाताळणी

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. १ (वार्ताहर) : जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) हे भारतातील प्रमुख कंटेनर पोर्ट असून जेएनपीटीने २०२१-२२ या आर्थिक वर्षात ५.१५ दशलक्ष टीईयूची विक्रमी हाताळणी केली आहे. बंदराच्या स्थापनेपासून आजवर एका आर्थिक वर्षात केली गेलेली ही सर्वाधिक मालहाताळणी आहे. ही कामगिरी जेएनपीटीचा व्यापार, सागरी तसेच बंदर क्षेत्रातील प्रगतीचा चढता आलेख दर्शवते.

जानेवारी २०२२ मध्येदेखील जेएनपीटीचा मालहाताळणीचा आलेख चढताच राहिला आहे. २०२० च्या ४.४७ दशलक्ष टीईयूच्या तुलनेत २०२१ मध्ये ५.६३ दशलक्ष टीईयू (२५.८६ टक्के अधिक) माल हाताळणी करत जेएनपीटीने मालवाहतुकीत सातत्यपूर्ण वाढ सुरूच ठेवली आहे. सध्या जेएनपीटी येथे पाच कंटेनर टर्मिनल्स कार्यरत आहेत. ज्यामध्ये जवाहरलाल नेहरू पोर्ट कंटेनर टर्मिनल (जेएनपीसीटी), न्हावा शेवा इंटरनॅशनल कंटेनर टर्मिनल (एनएसआयसीटी), गेटवे टर्मिनल्स इंडिया प्रा. लि. (जीटीआयपीएल), न्हावा शेवा इंटरनॅशनल गेटवे टर्मिनल (एनएसआयजीटी) आणि नव्याने स्थापन करण्यात आलेल्या भारत मुंबई कंटेनर टर्मिनल्स प्रायव्हेट लिमिटेडचा (बीएमसीटीपीएल) समावेश आहे. या बंदरात सर्वसाधारण कार्गोकरिता शॅलो वॉटर बर्थ आणि आणखी एक लिक्विड कार्गो टर्मिनल आहे, ज्याचे व्यवस्थापन बीपीसीएल-आयओसीएल कन्सोर्टियमद्वारे चालते.
-------
जेएनपीटीतील कामगारांच्या सामूहिक प्रयत्नांमुळेच ही विक्रमी कामगिरी करता आल्याचे जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी म्हणाले. कोरोना संकटानंतरच्या काळातही बंदराचा व्यवसाय शाश्वत, कार्यक्षम, किफायतशीर आणि सोयीस्कर बनवण्यासाठी अनेक उपाययोजना राबविण्यात येत असून भविष्यातदेखील आधुनिक पायाभूत सुविधा व नवीन तंत्रज्ञानासह आयात-निर्यात व्यापाराची वेळेवर आणि सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्याचे प्रयत्न सुरू राहतील, असेही सेठी यांनी सांगितले.
-----
चौकट
नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) हे भारतातील सर्वात मोठे कंटेनर हाताळणीचे बंदर आहे. २६ मे १९८९ मध्ये या बंदराची स्थापना झाली असून तीनपेक्षा कमी दशकांत जेएनपीटी हे देशातील बल्क-कार्गो टर्मिनलवरून प्रीमियर कंटेनर पोर्ट म्हणून नावारूपाला आले.