
मुंबई : ओमिक्रॉनची चाचणी जलद होणार
मुंबई, ता. ६ : कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे झटपट निदान व्हावे यासाठी पालिकेने जिनोम सिक्वेन्सिंगचे नवीन चाचणी किट खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या चाचणी किट्समधून ओमिक्रॉनचा अहवाल चार तासांत मिळणे शक्य होणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
कोरोनाच्या नवनवीन व्हेरिएंटचे निदान व्हावे यासाठी पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात जिनोम सिक्वेन्सिंग केले जाते, पण जिनोम सिक्वेन्सिंगचा अहवाल प्राप्त व्हायला किमान एका आठवड्याचा कालावधी लागतो. ही वेळखाऊ प्रक्रिया असल्या कारणाने पालिकेने भारतीय तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या आरटीपीसीआर चाचणी किट मागवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून सर्वांत तीव्र संसर्गित ओमिक्रॉनचे निदान होण्यास मदत होणार आहे.
‘ओमिशूअर किट’ जवळपास चार तासांमध्ये ओमिक्रॉनचे निदान करेल. त्यातून जिनोम सिक्वेन्सिंगसाठी लागणाऱ्या आठवड्याचा कालावधी वाचेल. पालिका पाच हजार नवीन चाचणी किट घेणार आहे. त्यातून ओमिक्रॉन आहे की नाही हे तपासण्यासाठी मदत होईल. त्याचा वापर येत्या आठवडाभरापासून सुरू केला जाणार आहे.
...म्हणून खरेदी
जिनोम सिक्वेन्सिंगनच्या मशीनमध्ये वापरण्यासाठी चाचणी किट बदलली जाईल. यातून फक्त ओमिक्रॉनचे निदान केले जाईल. जिनोम सिक्वेन्सिंगसाठीची अत्याधुनिक यंत्रणा असेल. या प्रक्रियेत चार कम्पोनंट असतात. चारपैकी तीन कम्पोनंट मशीनरी असतात आणि एक कम्पोनंट चाचणी किट असते, पण या सर्वसामान्य प्रक्रियेला सहा ते सात दिवस लागतात. त्यामुळे पालिका असे चाचणी किट खरेदी करत आहे जी उपलब्ध जिनोम सिक्वेन्सिंग मशीनमध्ये वापरता येईल आणि त्यामध्ये ओमिक्रॉन संशयित असेल तर त्याचा अहवाल चार तासांत मिळेल, असे पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
नोव्हेंबर २०२१ मध्ये ओमिक्रॉनचे निदान होण्यासाठी जिनोम सिक्वेन्सिंग हा एकमेव पर्याय होता. ज्यातून ओमिक्रॉनचे निदान अचूक होत होते. आम्ही ‘ओमिशूअर किट’चा वापर करून पाहिल्याने याची विशेष मदत झाली. या किटमुळे बराचसा वेळ वाचतो आणि ओमिक्रॉनचे निदान लवकर होते.
- डॉ. जयंती शास्त्री, जिनोम सिक्वेन्सिग प्रयोगशाळा प्रमुख, कस्तुरबा रुग्णालय
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..