निवडणुकीमुळे बाऊन्सरची मागणी वाढली
वाशी, ता. ७ (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिका निवडणुकीची प्रभाग रचना झाल्यापासून नवी मुंबईत हळदी-कुंकूच्या कार्यक्रमांचे पेव फुटले आहे. या कार्यक्रमाला राजकीय नेत्यांच्या सभांचे रूप येत असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी हळदी-कुंकूच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींला बोलावण्यात येत आहे. त्याचप्रमाणे महोत्सवांनादेखील राजकीय सभांचे रूप आले आहे. या कार्यक्रमांचे आयोजक नागरिकांचे लक्ष वेधले जावे म्हणून आपल्या सभोवताली खासगी रक्षकांचा (बाऊन्सर्स) ताफा घेऊन मिरवत दिसतात. त्यामुळे सध्या बाऊन्सरची मागणी वाढली आहे.
नवी मुंबई महापालिका निवडणुकीत राजकीय वातावरण तापू लागले आहे. अनेक नेते पिळदार शरीर असलेले काळ्या कपड्यांतील बाऊन्सर घेत कार्यक्रम करीत आहेत. हे बाऊन्सर कार्यक्रमांमध्ये कोणत्याही प्रकारांचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून काळजी घेत आहेत, तर काही जण नुसतेच आयोजकांच्या पुढे मागे फिरताना दिसतात. कार्यक्रमात लक्ष वेधून घेण्यासाठी काही स्वयंघोषित नेते तयार झाले आहेत. अनेक कलाकारही आपल्यासोबत बाऊन्सर्स बाळगतात. काळे टी-शर्ट जीन्स किंवा सफारीमध्ये दिसणारे बाऊन्सरही गर्दीचे लक्ष वेधून घेतात.
निवडणुकीमुळे अंगरक्षकाचे वधारले भाव
बाऊन्सरच्या कामाचे तास ठरले असून सहा तासांकरिता एका बाऊन्सरला लग्नसराईत दीड हजार रुपये घेतले जातात. मात्र राजकीय मेळावे, प्रचारसभांमध्ये मिरवण्याकरिता बाऊन्सर लागत असल्याने त्यांना दोन हजार रुपये दिले जातात. सहा तासांपेक्षा जास्त काम करायचे असल्यास त्याचा वेगळा मोबदला मिळतो. याशिवाय त्यांच्यासाठी पौष्टिक जेवणाची व्यवस्था करावी लागते.
कोण आहेत यात काम करणारे
जिम इन्स्ट्रक्टर, सुशिक्षित बेरोजगार तरुण पूर्णवेळ या क्षेत्रात काम करताना दिसतात. बाऊन्सरचे काम करणाऱ्याकडे उत्तम शारीरिक तंदुरुस्ती, स्मार्ट चेहरा, उत्तम अॅटिट्यूड आणि नजरेत जरब या गोष्टी असायला हव्यात. बाऊन्सरचे काम करणाऱ्यांना शिफ्ट ड्यूटीत काम करण्याची तयारी हवी. बाऊन्सरला अनेकदा सहा तास उभे राहून काम करावे लागते. शिवाय कार्यक्रम अधिक वेळ चालल्यास त्यांना न थकता काम करावे लागते.
संरक्षणाची जबाबदारी महत्त्वाची
बाऊन्सर्सचे मुख्य काम राजकीय नेते, सेलिब्रिटी अथवा श्रीमंत व्यक्तीच्या सभोवती सुरक्षा कवच तयार करून गर्दीपासून रक्षण आहे. ज्या व्यक्तीच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर असते, त्याच्यासोबत सतत वावरावे लागते. काही वेळा चाय से किटली गरम या उक्तीप्रमाणे सेलिब्रिटींच्या सोबत असलेले बाऊन्सर लोकांना धक्काबुक्की करीत असल्याचे आढळले आहे. विशेष करून मीडिया आणि बाऊन्सरमध्येही अनेकदा हातघाईवर येण्याचे प्रसंग घडले आहेत.
आमच्याकडे ५० बाऊन्सरचा ग्रुप आहे. आवश्यकतेनुसार आम्ही बाऊन्सर पुरवतो. बाऊन्सर्सचे महत्त्वाचे काम असते नेते, सेलिब्रिटी यांच्या दिशेने येणारी गर्दी सांभाळणे, एक बाऊन्सर साधारण सहा तास काम करतो. त्या कामाचे त्याला दोन ते अडीच हजार रुपये आकारले जातात. लग्नसोहळे, राजकीय मेळावे, कार्यालय तसेच इतर ठिकाणी बाऊन्सर दिले जातात.
- विशाल म्हस्के, बाऊन्सर पुरवणारा कंत्राटदार.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.