
स्थायीत मिनिटाला १७० कोटींचे निर्णय
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : पालिकेच्या शेवटच्या स्थायी समितीच्या बैठकीत आज तब्बल २५० प्रस्ताव मंजूर झाले आहेत. याद्वारे ५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा निर्णय अवघ्या ३० मिनिटांत घेण्यात आला; परंतु यातील अनेक प्रस्ताव नियमानुसार मांडण्यात आले नसल्याचा दावा भाजपने केला. शेवटच्या दिवसाचे कामकाज गोंधळात पार पडले असून प्रत्येक मिनिटाला साधारण १६६ कोटी रुपयांचे प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर झाले.
पालिकेची मुदत संपल्याने उद्यापासून सर्व कारभार प्रशासनाच्या हाती जाईल. आज झालेल्या स्थायीच्या बैठकीत तब्बल तीन हजार कोटींहून अधिक रकमेचे प्रस्ताव मांडण्यात आले होते. तर पूर्वीचे राखीव प्रस्ताव मिळून ६ हजार कोटींच्या कामांचा निर्णय होणार होता, असे सुमारे ३५० प्रस्ताव समितीच्या पटलावर होते. त्यातील २५० प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून १० प्रस्ताव राखीव ठेवण्यात आले आहेत.
स्थायी समितीचे प्रस्ताव तीन दिवसांपूर्वी सदस्यांना मिळणे आवश्यक होते. मात्र, अनेक प्रस्ताव विलंबाने मिळाल्याचा आक्षेप घेत या कामकाजावर हरकतीचा मुद्दा उपस्थित करण्याची परवानगी भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे मागितली. मात्र, त्यांनी ती नाकारत कामकाज सुरू केले. त्यावर भाजपच्या सदस्यांनी घोषणाबाजी करत सभागृह दणाणून सोडले, प्रस्तावांचे तुकडे करत अध्यक्षांच्या दिशेने भिरकावले. भाजपच्या घोषणाबाजीला शिवसेनेच्या सदस्यांनीही घोषणांनी उत्तर दिले. या गोंधळातच बैठकीचे कामकाज पूर्ण करण्यात आले. बैठक संपल्यानंतर भाजपच्या सदस्यांनी आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांच्या दालनाबाहेरही ठिय्या आंदोलन केले.
पालिका आयुक्तांनी पालिकेतील भ्रष्टाचाचाराला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी आहे. नियमानुसार स्थायी समितीचे कामकाज झाले नाही. हे पैसे कष्टकऱ्यांचे आहेत. मात्र, स्थायी समिती अध्यक्षांनी नियम न पाळता सर्व प्रस्ताव मंजूर केले. त्यासाठी आयुक्तांनी स्थायी समिती अध्यक्षांवर कठोर कारवाई करावी.
- प्रभाकर शिंदे, भाजप गटनेते
-------
स्थायी समितीत नागरिकांच्या गरजेचे आणि मुंबईच्या विकासाचे निर्णय घेतले जातात. नियमानुसार काम झाले आहे. चार वर्षांच्या काळात सर्व पक्षीय सदस्यांनी सहकार्य केले. भाजपला आता भ्रष्टाचार दिसत असला तरी २५ वर्ष ते आमच्या सोबत होते. आता फक्त नैराश्यातून हे आरोप केले जात आहेत.
- यशवंत जाधव, स्थायी समिती अध्यक्ष.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..