Gunabai
Gunabaisakal media

नवी मुंबई : आगरी-कोळी खाद्य संस्‍कृतीतील खेकडा शेती

तुर्भे : महाराष्ट्र खाद्य संस्कृतीतील विशेषतः आगरी-कोळी (Agari koli food) खाद्य संस्‍कृतीतील एक आवडता पदार्थ म्हणजे चिंबोरी (Crab), म्हणजेच खेकडा. नाव घेताच डोळ्यांसमोर खेकड्याचे झणझणीत कालवण, भरले खेकडे, खेकडा लॉलीपॉप (crab lollypop) आले. या खेकड्याची शेती (Crab farming) करणाऱ्या उद्योजिका गुणाबाई यांचा जीवनप्रवास थक्क करणारा जरी असला तरी भल्याभल्यांसाठी प्रेरणादायी ठरतोय. आज वयोमानानुसार त्या खेकड्याच्या व्यवसायात नसल्या तरी त्यांचे मार्गदर्शन नव्या पिढीला नेहमीच लाभते.

Gunabai
रायगड : मानवनिर्मित वणव्यांमुळे वनांचा ऱ्हास; पक्ष्यांसाठी भूतदया

हिरव्या-लाल रंगाच्या टपोऱ्या चिंबोऱ्या. मस्त भरलेल्या एका चिंबोरीचे वजन अडीच-तीन किलो. या वजनदार चिंबोऱ्यांशी दोन हात करणाऱ्या गुणाबाई सुतार वाशी गावात राहतात. शिक्षण फक्त पहिली पास. वयाच्या आठव्या वर्षापासून त्‍या खेकडे पकडण्यात माहीर. आज वयाच्या ७५ व्या वर्षीही त्यांचा खेकडे पकडण्याचा उत्साह वाखणण्याजोगा आहे. फळीवरून फिरत बिनधास्त चिखलात हात घालून अगदी शिताफीने त्या खेकडे पकडतात.

खेकड्याला हात लावताच तो भरलेला आहे की रिकामा, हे गुणाबाईंना लगेच समजते. भरलेल्या खेकड्याची किंमत जास्त आणि रिकाम्या खेकड्याची किंमत कमी असते. त्यामुळे रिकामा खेकडा पुन्हा तलावात सोडला जातो. या खेकड्यांना दोन वेळचे जेवण दिले जाते. त्यांना खाण्यासाठी वाम, मुशी माशांचे तुकडे दिले जातात. १५-२० दिवसांतच खेकडे चांगले मोठे आणि खाण्याजोगे होतात. त्यानंतरच या खेकड्यांना बाहेर काढले जाते. खेकडे एकमेकांना चावू नयेत म्हणून त्यांच्या नांग्या दोरीने बांधल्या जातात. या खेकड्यांना एका थंड खोलीत म्हणजे शीतपेटीत ठेवले जाते आणि मागणीनुसार खेकड्यांची निर्यात केली जाते.

Gunabai
मेंदूच्या विचित्र आजारांवर 'KEM' मध्ये यशस्वी उपचार ; 'त्या' महिलेने घेतला मोकळा श्वास

गुणाबाई आणि त्यांचे खेकडे केवळ मुंबईतच नाही तर परदेशातही प्रसिद्ध आहेत. नवी मुंबईत तर अगदी घराघरांत आणि अनेक हॉटेलमध्ये गुणाबाईंच्या खेकड्यांची चव पोहोचलीय. हॉटेलांमध्ये ५ ते २० किलोपर्यंत खेकड्यांची मागणी असते; तर परदेशात ५०० किलोपर्यंतचे खेकडे पोहोचवले जातात. सध्या कोरोना व वाढलेल्‍या विमान भाड्यामुळे सिंगापूर, मलेशिया या देशांना खेकडे पुरवणे बंद केले आहे. एक एकर तलावात गुणाबाई खेकडा संवर्धनाचा व्यवसाय सुरू केला. आज त्या तलावात दोन जातींचे खेकडे आढळतात. लाल खेकडे हे आकाराने छोटे असतात. ज्यांचे वजन २.५ ते ४ ग्रॅम इतके असते.

बाजारात त्यांची किंमत ५००-८०० रुपये इतकी आहे. हिरवे खेकडे हे आकाराने मोठे असतात. एका खेकड्याचे वजन १ ते ३ किलोपर्यंत असते. ज्याची बाजारात किंमत १२०० ते १४०० रुपये इतकी आहे. लाल खेकडे हे मुंबईत जास्त विकले जातात. हिरव्या खेकड्यांना परदेशात मागणी आहे. पावसाळ्याचे चार महिने तर खूप व्यापात जातात, कारण याच काळात खेकड्यांची मोठ्या प्रमाणात पैदास होते.गुणाबाई यांचा मुलगा सुभाषनेसुद्धा सुरुवातीपासून खेकडा व्यवसायात साथ दिली. लहानपणापासून आईला व्यवसाय करताना ते पाहायचे.

त्यामुळे या व्यवसायातले सर्व छक्के-पंजे सुभाष यांना माहीत आहेत. शिक्षण घेत सुभाषने सुरुवातीला अकाउंट्स डिपार्टमेंट हातात घेतले. त्यानंतर आईच्या खांद्याला खांदा लाऊन सुभाष यांनी सर्व जबाबदारी पार पाडली. आईच्या वयोमानानुसार सध्या तेच हा व्यवसाय सांभाळत आहेत. गुणाबाई यांच्याकडू प्रेरणा घेऊन अनेकांनी स्‍वतःचा व्यवसाय सुरू केला आहे.

खेकड्यांच्या संवर्धनासाठी तलाव

गुणाबाई आणि त्‍यांचा मुलगा सुभाष यांनी तलाव उभारण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. खेकड्यांच्या संवर्धनासाठी तलावाची संरचनाही वेगळी आखली आहे. भरती आणि ओहोटीची वेळ लक्षात घेऊन समुद्रातून आलेले पाणी तलावात सोडले जाते. त्यासाठी छोटा बांध घातला आहे. बांधाच्या मदतीने भरतीच्या वेळी वाढलेले पाणी दरवाजे उघडून तलावात सोडले जाते. जवळपास दर आठ-दहा दिवसांनी तलावातील पाणी बदलावे लागते.

तरुणांना खेकडा पकडण्याचे प्रशिक्षण

आठ वर्षांची असताना त्या वडिलांसोबत मासे आणि खेकडे पकडायला वाशी खाडीत जायच्या. त्या वेळी वाशीला लोकल येत नव्हती. खाडीत उतरून मासे आणि खेकडे पकडायच्या. त्यानंतर हातहोडीने मानखुर्दला जाऊन मुंबईला मासे आणि खेकडे विकायच्या. दादर, भायखळा, परेल, आगरबाजार, सिटी लाईट, ग्रँड रोड अशा अनेक मार्केटमध्ये मासे आणि खेकड्यांना चांगला भाव मिळायचा. त्यानंतर ते चेन्नईला माल निर्यात करू लागले.

हळूहळू व्यवसाय वाढत गेला आणि त्यानंतर खेकडे निर्यात करण्यासाठी लागणारे सर्व परवाने मुलगा सुभाषच्या मदतीने काढून घेतले. त्यानंतर परदेशातही निर्यात करू लागले. खेकडा व्यवसायाला चालना मिळावी यासाठी तरुणांना मार्गदर्शन देण्याचे कामही सुभाष करतात. खेकडे कसे पकडायचे? त्यांची विक्री कशी करायची? याबद्दल तरुणांना शिकवले जाते. त्यानंतर पुढच्या प्रशिक्षणासाठी त्‍यांना चेन्नईमध्ये असलेल्या खेकडा सेंटरमध्ये पाठवले जाते.

कोरोनामुळे परदेशात खेकड्यांची निर्यात बंद करण्यात आली आहे. त्यात विमानाचा प्रवास खर्चही अधिक असल्याने सध्यातरी खेकडे मुंबईसह अन्य राज्‍यांत पाठवले जातात. कोरोनापासून आई व्यवसायात सक्रिय नसली तरी तिचे मोलाचे मार्गदर्शन नेहमीच लाभते.
- सुभाष सुतार, गुणाबाई यांचा मुलगा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com