
मेंदूच्या विचित्र आजारांवर 'KEM' मध्ये यशस्वी उपचार ; 'त्या' महिलेने घेतला मोकळा श्वास
मुंबई : मेंदूच्या एका सहज निदान न होणाऱ्या आजाराचे (Brain disease) योग्य निदान करून केईएम रुग्णालयातील (kem hospital) डॉक्टरांनी एका महिलेवर यशस्वी उपचार केल्याचे समोर आले आहे. मुंबईतील काळबादेवी परिसरात राहणाऱ्या डिंपल चोक्सी (Dimpal choksi) यांच्या मेंदूत बिघाड झाल्यामुळे जवळपास सहा महिने त्यांचा स्वतःवर नियंत्रण नव्हते. दुसऱ्या कोणत्या तरी भाषेत बोलणे, जोरजोरात आणि वेगळ्या पद्धतीने हसणे, सरळ चालण्याऐवजी घड्याळ्याच्या काट्यासारखे स्वतःच्या भोवती फिरत राहणे आणि डोक्यावरचे केस खेचत राहणे अशी त्यांची लक्षणे होती.
हेही वाचा: रायगड : मानवनिर्मित वणव्यांमुळे वनांचा ऱ्हास; पक्ष्यांसाठी भूतदया
एका रात्रीत या महिलेत एवढे अचानक बदल झाल्याने तिचे कुटुंबीय चिंतेत पडले होते. ऑगस्ट २०२१ च्या एका सकाळी तिचे अचानक डोके दुखू लागले होते. त्यानंतर तिच्या वागण्यात बदल जाणवू लागला, असे या महिलेचे पती अमित चोक्सी यांनी सांगितले. ब्रश कसे करायचे हेदेखील आठवत नव्हते, एवढी वाईट परिस्थिती या महिलेवर ओढवली होती. कुटुंबांनी जवळपास १० वेगवेगळ्या डॉक्टरांना भेट दिली.
ज्यात मुंबई आणि अहमदाबादमधील मानसोपचारतज्ज्ञ, न्यूरोलॉजिस्ट आणि होमिओपॅथीच्या डॉक्टरांचा समावेश होता. ऑगस्ट ते जानेवारी या कालावधीत वेगवेगळ्या डॉक्टरांच्या भेटीदरम्यान अनेक निदाने करण्यात आली. ज्यात या महिलेला सायकोसिस आणि स्किझोफ्रेनिया याचेही निदान करण्यात आले होते. डिंपल यांना १५ वेगवेगळ्या गोळ्या दिल्या जात होत्या, ज्याच्यात सहा मानसिक आजारांसंबंधित गोळ्यांचा समावेश होता.
हेही वाचा: Raj Thackeray Live : मशिदींवरील भोंगे काढा अन्यथा... राज ठाकरेंचा इशारा
या सर्व परिस्थितीत फेब्रुवारी महिन्यात परळच्या केईएम रुग्णालयात भेट दिल्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी या महिलेला सिरोनेगेटिव ऑटोइम्युन एन्सेफलीटीस या दुर्मिळ परिस्थितीचे निदान केले. त्यानंतर महिलेची आधीची सर्व लक्षणे हळूहळू कमी व्हायला सुरुवात झाली आणि गेल्या सहा महिन्यांत तिने काय काय केले याचा तिला विसर पडला.
पेट स्कॅनचा वापर
केईएम रुग्णालयात महिन्याच्या एका बैठकीत दुर्मिळ केसेसवर चर्चा केली जाते. न्यूरोलॉजिस्ट डॉ. पार्थ्वी रावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिंपल यांच्या केसमध्ये पेट स्कॅन वापरून त्यांचा आजार शोधला गेला. पेट स्कॅन सामान्यतः कर्करोगाच्या पेशींच्या निदानासाठी वापरले जाते. तिचे निरीक्षण केल्यावर आणि कुटुंबाचे म्हणणे ऐकल्यावर ऑटोइम्युन एन्सेफलिटीसचे निदान केले; पण निदान कठीण होते. सिरोनेगेटिव्ह ऑटोइम्युन एन्सेफलिटीस मानसोपचार आणि न्यूरोलॉजी यात बिघाड झाल्यानंतरची परिस्थिती आहे. उपचारांना या महिलेने प्रतिसाद द्यायला सुरुवात केल्यानंतर निदान पूर्ण झाले. पुन्हा एकदा पेट स्कॅन केले गेले ज्यात तिची परिस्थिती सुधारताना आढळली.
निदान करणे अवघड
या रुग्णाची जी परिस्थिती होती तशा परिस्थितीत आजाराचे निदान करणे अनेकदा शक्य नसते, असे केईएम रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..