
वसई : वृक्षांना जगवण्यासाठी सलाईनद्वारे पाणी ! ठिबक सिंचन पद्धतीचा वापर
वसई : उन्हाच्या झळा इतक्या वाढल्या आहेत, की नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे; तर वृक्षांचे, पक्ष्यांचे काय होत असेल याची कल्पनादेखील न केलेली बरी. त्यामुळेच वृक्षांना वाचवण्यासाठी (tree conservation) वसईत मोहीम हाती घेण्यात आली आहे. वसई सन सिटी, सूर्या गार्डन परिसरात असलेल्या विविध जातींच्या रोपांना नन्हे हाथ फाऊंडेशन (Nanhe haath Foundation) या संस्थेने दत्तक घेतले आहे. या रोपांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळावे म्हणून सलाईनप्रमाणे रोपांच्या जवळ पाणी भरून (saline water) बाटल्या लावल्या आहेत. या बाटल्यांमधून या रोपांना ठिबक सिंचन पद्धतीने पाणीपुरवठा केला जात आहे.
हेही वाचा: पलावा जंक्शन परिसरातील वायू प्रदूषण रोखा; आमदार पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
संस्थेचे ३५ सदस्य रोपांना पाणी मिळावे यासाठी मेहनत घेतात. रोपांच्या जवळ किंवा रोपाची सुरक्षा म्हणून बसवलेल्या लोखंडी पिंजऱ्यावर पाण्याची बाटली सलाईनप्रमाणे लावतात. या बाटलीत सकाळी ७ च्या सुमारास हे सदस्य पाणी भरतात. तेथून हे पाणी सलाईनप्रमाणे रोपांना पुरवले जाते.प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे अनेक जण वृक्षलागवड करण्यासाठी प्रोत्साहन देतात.
काही संस्था पुढाकार घेऊन वृक्षरोपणदेखील करतात; मात्र एकदा वृक्षारोपण झाले की ते रोप जगले की मेले हेसुद्धा नंतर पाहिले जात नाही; मात्र लागवड करण्यात आलेली सर्वच झाडे जगावीत यासाठी नन्हे हाथ फाऊंडेशन मेहनत घेत आहे. सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे रोपांना पाण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. अशातच सनसिटी येथील मोकळ्या जागेत असणारी १०० रोपे व सूर्या गार्डन येथील ३५ रोपांना नित्यनेमाने संस्थेकडून पाणी मिळत असल्याने वृक्ष टवटवीत असल्याचे दिसून येत आहेत.
हेही वाचा: कर्जत शहराला पाणीटंचाईची झळ; हंडा मोर्चा काढण्याचा महिलांचा इशारा
नागरिकांचा पुढाकार
नन्हे हाथ फाऊंडेशनने सुरू केलेला उपक्रम पाहून आता मॉर्निंग वॉकसाठी येणारे नागरिक रोज घरातून पाणी आणून ते झाडांना घालत आहेत. त्यामुळे वृक्ष लावा व जगवा या मोहिमेला प्रोत्साहन मिळत आहे.
पर्यावरण समतोल राहावा याकरिता प्रत्येकाने पुढे आले पाहिजे. केवळ झाडे लावणे इतक्यावर थांबून चालणार नाही, तर त्याची निगा राखणे महत्त्वाचे काम आहे. आमचे सदस्य रोज अशा रोपांना पाणी देत आहेत. पूर्ण वसईत हा उपक्रम व्यापक स्वरूपात हाती घेतला जाणार आहे.
- संजय वैष्णव, ललित चव्हाण, संस्थापक, नन्हे हाथ फाऊंडेशन
सकाळी ताजा ऑक्सिजन मिळावा म्हणून स्वच्छ वातावरणात फेरफटका मारला जातो, परंतु प्रदूषणदेखील तितकेच वाढत आहे. त्यामुळे वृक्षसंवर्धनाची गरज आहे; अन्यथा सामाजिक आरोग्य संकटात येण्याची भीती आहे.
- अजय नथियाल, पर्यावरणप्रेमी, वसई
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..