ठाणे : संजय गांधी निराधार योजनेचा आधार; २७५ महिलांना मिळाला लाभ | Sanjay gandhi niradhar yojana | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay gandhi Niradhar Yojana
निराधार योजनेचा २७५ महिलांना लाभ

ठाणे : संजय गांधी निराधार योजनेचा आधार; २७५ महिलांना मिळाला लाभ

ठाणे : मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीने (corona pandemic) थैमान घातले होते. या महामारीच्या काळात अनेक संसार उद्‍ध्वस्त झाले आहेत. अनेक बालके पोरकी झाली आहेत; तर अनेक महिलांच्या पतीचे निधन (family deaths) झाल्याने त्या विधवा झाल्या आहेत. अशा निराधार महिलांना जिल्हा प्रशासनाने संजय गांधी निराधार योजनेंतर्गत (sanjay gandhi niradhar yojana) आधार मिळावा यासाठी, हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार आतापर्यंत जिल्ह्यातील २७५ विधवा महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

हेही वाचा: राज ठाकरेंवरील टीकेनंतर शालिनीताईंचा प्रकाश आंबेडकरांच्या मुलावर प्रहार

कोव्हिडमुळे अनेकांची परिस्थिती हालाखीची झाली आहे. अनेक घरांमध्ये कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यामुळे अनेक महिला निराधार झाल्या आहेत, तसेच बालके अनाथ झाली आहेत. त्यामुळे अशा लोकांना तातडीने मदत मिळावी, यासाठी सर्व यंत्रणांकडूनदेखील मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू आहेत. या योजनेंतर्गत विधवांना प्रतिमाह १ हजार १०० रुपये इतके अनुदान त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.

त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाला हातभार लागणार आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत कोव्हिडमुळे पतीचे निधन झालेल्या ९४५ महिलांची माहिती संकलित करण्यात आली आहे. त्यापैकी २७५ महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यात आला आहे. उर्वरित महिलांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी तातडीने पूर्तता करण्यात येत असून प्रस्तावदेखील तयार करण्याचे काम सुरू आहे. तसेच अशा महिलांना स्वयंपूर्ण व सक्षम करण्यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव आहे. याद्वारे या महिला स्वतः काम करून घर चालवू शकतील. तसेच या महिलांना रोजगार मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यातील कोरोनाने पती गमावलेल्या विधवा महिलांसाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिलेल्या निर्देशानुसार आतापर्यंत २७५ महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यात आला आहे. तसेच उर्वरित महिलांनादेखील याचा लाभ मिळावा, यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आले असून त्या महिलांनादेखील लवकरात लवकर या योजनेचा लाभ मिळणार आहे.

- महेंद्र गायकवाड, महिला व बाल विकास अधिकारी, ठाणे

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..