
मध्य रेल्वेतील कनिष्ठ अभियंताचे अपहरण
डोंबिवली, ता. ८ ः मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली येथील यार्डात कनिष्ठ अभियंत्याला तीन व्यक्तींनी नोकरी घालवण्याची धमकी देत त्याचे मंगळवारी रात्री १० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केले. मोहित सिंह यांच्या पत्नीकडे त्यांनी खंडणीदेखील मागितली; मात्र पोलिस येत असल्याची खबर लागताच अपहरणकर्त्यांनी मोहिते यांना सोडत तेथून धूम ठोकली. याप्रकरणी डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्यात मोहिते यांनी तक्रार दाखल केली असून पोलिस अपहरणकर्त्यांचा शोध घेत आहेत.
नेरळ येथे राहणारे मोहित सिंह (वय २६) हे मध्य रेल्वेमध्ये नोकरीस असून सध्या ते ठाकुर्ली यार्ड येथील कार्यालयात कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी रात्री ते कर्तव्यावर असताना ११.२० च्या सुमारास त्यांच्या कार्यालयात तीन अनोळखी व्यक्ती आल्या. त्यांनी जबरदस्ती मोहित यांना पकडून ठाकुर्ली स्थानकाबाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये बसविले. त्यांना शिवीगाळ करीत नोकरी घालवतो, अशी धमकी दिली व १० लाखाची खंडणी मागितली. त्यानंतर मोहित यांच्या पत्नीशी फोनवर संपर्क साधत पतीच्या सुटकेसाठी खंडणीची मागणी केली. अपहरणकर्त्यांनी मोहितला रात्री पावणेदोनच्या सुमारास ठाकुर्ली स्टेशनबाहेर सोडत तेथून पळ काढल्याची माहिती तक्रारदार मोहित यांनी डोंबिवली लोहमार्ग पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास अधिकारी पोलिस निरीक्षक मुकेश ढगे करीत आहेत. सीसीटीव्ही व इतर तांत्रिक बाबींच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. लवकरच या प्रकरणाचा उलगडा केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
पत्नीच्या प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोहित यांच्या पत्नीने प्रसंगावधान राखत तत्काळ पोलिस कंट्रोलला फोन करून मदत मागितली. नियंत्रण कक्षातील पोलिसांनी मोहितच्या मोबाईलवर संपर्क साधत आपण कार्यालयात ते ड्युटीवर आहेत की नाही, याची चौकशी करण्यासाठी येत असल्याचे सांगितले. पोलिस येत असल्याचे समजताच त्यांची सुटका केली.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..