लाल मिरचीला महागाईचा तडका; घरगुती मसाल्याला ग्राहकांची पसंती | Red chilly update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

red-chilli
लाल मिरचीला महागाईचा तडका

लाल मिरचीला महागाईचा तडका; घरगुती मसाल्याला ग्राहकांची पसंती

वाशी : उन्हाचा पारा वाढताच गृहिणींची आगोटीच्या कामांना सुरुवात होते. लाल मिरची (Red chilly purchasing) खरेदीसाठी सध्या बाजारात मोठी लगबग पाहण्यास मिळत आहे. घरगुती तिखट, तसेच मसाला तयार करण्यासाठी म्हणून लाल मिरचीला (red chilly big demand) मोठी मागणी आहे. यंदा तुलनेने आवक कमी असल्याने भाव चांगलेच वधारल्याचे चित्र आहे. अवघ्या चाळीस दिवसांतच लवंगी, गुंटूर, चपाटासह काश्मिमीरी मिरचीच्या दरात वाढ (Kashmir chilly rate increases) झाल्याचे चित्र आहे.

हेही वाचा: नवी मुंबईवर १,५०० CCTV कॅमेऱ्यांची असणार नजर; खाडीकिनारी नऊ थर्मल कॅमेरे

लाल तिखट असो की विविध प्रकारचे मसाले बाजारात, किराणा दुकानात रेडिमेड उपलब्ध आहेत. मात्र घरचे तिखट, मसाल्‍याची चवच न्यारी. त्‍यामुळे वर्षभर पुरेल इतके लाल तिखट, घरगुती मसाला तयार करून घेण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू आहे. चांगल्या प्रकारे वाळलेली लाल मिरचीची आवक जानेवारीपासून बाजारात उपलब्ध होते. सध्या स्थानिक भागासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण आदी ठिकाणांहून लाल मिरचीची प्रामुख्याने आवक सुरू आहे. यंदा राज्‍यातून आवक नाममात्र असून तेलंगणातून भरपूर आवक होत आहे.

बाजारात बेडगी, गुंटूर, तेजा, चपाटा, रसगुल्ला, काश्मिरी, संकेश्वरीसह मागणी असलेली तिखट लवंगी मिरची उपलब्ध आहे. खरेदीसाठी काही दिवसांपासून ग्राहकांची मोठी रेलचेल दिसून येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत लाल मिरचीचे भाव दर्जानुसार ८ ते १५ टक्क्यांनी वाढले असतानाच, चाळीस दिवसांतच लवंगी, गुंटूरच्या दरात किलोमागे सुमारे २० रुपयांची, चपाटाच्या दरात ३० ते ४० रुपयांची, तर रसगुल्लाच्या दरात तब्बल ९० ते १०० रुपयांची दरवाढ झाल्याचे चित्र आहे.

हेही वाचा: कल्याण रेल्वे स्थानक बनला मृत्यूचा सापळा; तीन महिन्यात ७८ जणांचा मृत्यू

गतवर्षीच्या तुलनेत उत्‍पादन कमी झाल्‍याने लाल मिरचीचे भाव वाढले आहेत. साफ केलेल्या, देठ तोडलेल्या मिरच्या हव्या असतील तर त्यासाठी किलोमागे २० ते ३० रुपये अधिक मोजावे लागतात.

- सुमेश शहा, मिरची विक्रेता.

घरगुती मसाल्याला पसंती

घरगुती मसाले तयार करण्यासाठीही ग्राहकांची मोठी लगबग सुरू आहे. भारतीय आहारात मसाल्याचे महत्त्व अधिक असून खाण्यापिण्याच्या आहार पद्धतीनुसार मसाला हा तयार केला जातो. मसाला तयार करण्यासाठी लागणाऱ्या तेजपानसह विविध वस्तूंना मोठी मागणी वाढली आहे. यात चांगल्या दर्जाची अख्खी हळद किलोमागे २० ते ३० रुपयांनी महागली आहे. हळदीचा भाव सध्या १४० ते १७० रुपये असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. यासह धने १२० ते १७० रुपये किलो, तेजपान ७० ते ९० रुपये, शहाजिरे ५५० ते ७५० रुपये असे भाव असून यासह हिरवी वेलची, दालचिनी, काळे मिरे, कर्णफूल, दगडफूल, रामपत्री, जावत्री, त्रिफळा आदींना मागणी असल्याचे त्यांनी नमूद केले.

लाल मिरचीचे दर (किलोप्रमाणे, रुपयांमध्ये)

मिरची फेब्रुवारी आजचे

लवंगी १६०-१८०, १८०-२००
ब्याडगी ३२०-३५०, ३२०-३५०
गुंटूर २००-२२०, २२०-२४०
चपाटा २२०-२५०, २५०-३००

हळदी १४० ते १७०
धने १२० ते १७०
तेजपान ७० ते ९०
शहाजिरे ५५० ते ७५०

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Navi MumbaichillyVashi
go to top