
मुंबईकरांचे हाडे, सांध्याचे आरोग्य बिघडले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : कोविड संसर्गात मुंबईकरांनी त्यांच्या हाडांचे आणि सांध्यांचे आरोग्य बिघडवल्याचे एका अहवालातून स्पष्ट झाले आहे. घटलेली शारीरिक हालचाल, बदललेली जीवनशैली यामुळे मुंबईकरांच्या हाडे व सांध्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला. शहरात ऑर्थोपेडिक तक्रारींच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले असून हे चिंताजनक सर्वेक्षण मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयासह इतर रुग्णालयातील गटाने केले. यात डॉक्टरांनी हाडे व सांध्याचे आरोग्य, कोरोनाचे दीर्घकालीन परिणाम याबाबत माहिती जाणून घेतली.
या संशोधनामध्ये १८ वर्षांवरील ५,००५ मुंबईकरांचा समावेश होता. प्रतिसादकांपैकी ६५ टक्के महिला, तर ३५ टक्के पुरुष होते, बहुतांश प्रतिसादकांचे वय ३१ ते ४० वर्षांदरम्यान होते. हे सर्वेक्षण गॅजेटचा वापर, कार्यालयीन, घरातील कामे यामधील संतुलन, कोरोनाकाळात झालेले जीवनशैलीतील बदल आणि हाडांच्या आरोग्याला दिले गेलेले महत्त्व यावरही लक्ष केंद्रित करते. यामधून अनेकजण हाडे व सांध्यांच्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत असे निदर्शनास आले. ऑर्थोपेडिक्स अॅण्ड जॉइण्ट रिप्लेसमेंट सर्जरीचे संचालक डॉ. कौशल मल्हान म्हणाले, ‘महामारीमुळे अनेक जण गेली दोन वर्षे व्यायाम आणि इतर गोष्टींपासून दूर राहिले. आता त्यांनी कोविडपूर्व जीवनशैली व व्यायामाकडे परतताना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. त्यांनी हाडांची तपासणी केली पाहिजे.
हिरानंदानी रुग्णालयातील ऑर्थोपेडिक सर्जरीचे विभागप्रमुख डॉ. प्रमोद भोर म्हणाले, की सर्वेक्षणातून २६ टक्के मुंबईकरांना रुग्णालयात जाण्याच्या भीतीमुळे विलंब केला आणि ५८ टक्के मुंबईकर गंभीर स्थिती नसल्यामुळे औषधोपचाराच्या माध्यमातून ऑर्थोपेडिक समस्यांचे व्यवस्थापन करू शकले.
मुंबईकरांचे कोविडकाळातील जीवन
५६ टक्के मुंबईकरांनी घर संभाळण्यासोबत वृद्ध व मुलांची काळजी घेतली
७३ टक्के मुंबईकरांकडे घरातील कामे करण्यासाठी योग्य सेटअप नव्हता
४१ टक्के मुंबईकरांनी १० तासांहून अधिक काम केले
१८ टक्के मुंबईकर संगणकावर काम करत नसताना फोनवर चिटकून राहिले
४० टक्के मुंबईकरांनी दोन ते चार तास घरातील, बाहेरील कामे केली
७५ टक्के मुंबईकरांनी हाडे व सांध्यासंबंधित समस्यांचा सामना केला.
२५ टक्के मुंबईकरांना मान व खांद्याच्या समस्या जाणवल्या.
१९ टक्के मुंबईकरांना पाठ व पायाच्या समस्या जाणवल्या.
८ टक्के मुंबईकरांना हात-पाय सुस्त पडल्यासारखे वाटले.
२५ टक्के मुंबईकरांना अस्वस्थतेमुळे पुरेशी झोप मिळाली नाही.
५८ टक्के मुंबईकरांनी आपल्या आजारांवर औषधोपचार केले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..