
मानखुर्दमध्ये तणावपूर्ण शांतता
मानखुर्द, ता. १२ (बातमीदार) ः मानखुर्दच्या म्हाडा वसाहतीमध्ये रविवारी (ता. १०) रात्रीच्या घटनेनंतर सोमवारी तणावपूर्ण शांतता दिसली. अनूचित घटना टाळण्यासाठी मानखुर्द पोलिसांनी खबरदारी घेत कडक बंदोबस्त ठेवला होता. दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात तक्रार दिली असल्याचे वरिष्ठ निरीक्षक महादेव कोळी यांनी सांगितले.
मानखुर्दच्या म्हाडा वसाहतीमध्ये रविवारी रात्री एक गट रामनवमी असल्याने ‘जय श्रीराम’ अशी घोषणा देत दुचाकीवरून निघाला होता. रमजान महिना सुरू असल्यामुळे नमाज पठण करण्यात या घोषणांनी व्यत्यय येत असल्याचे निदर्शनास आणून देत स्थानिकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वाद झाला व त्यानंतर हाणामारी झाली. त्यामध्ये दोन्ही गटातील काही जण जखमी झाले. त्यानंतर अनोळखी टोळक्याने काठी, लोखंडी रॉड व धारदार शस्त्राच्या सहाय्याने परिसरात दहशत माजवत सुमारे २० ते २५ वाहनांची तोडफोड केली.
घटनेतील दोन्ही गटांनी एकेमकांविरोधात मानखुर्द पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. या वाहनांची तोडफोड करणाऱ्या अज्ञात टोळक्यांविरोधात अब्दुल्ला शेख यांनी तक्रार केली आहे. त्यांच्या चुलत भावाच्या उपजीविकेचे साधन असलेल्या रिक्षाचे या घटनेत नुकसान झाले. या घटनेनंतर उच्चपदस्थ पोलिस अधिकारी, स्थानिक आमदार अबू आझमी, भाजपचे ईशान्य मुंबई अध्यक्ष ॲड. विजय रावराणे यांनी त्या ठिकाणी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व नागरिकांना शांततेचे आवाहन केले. मानखुर्द पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..