
निवडणुकीमुळे संमेलन अध्यक्षपदाची गरीमा संपते
निवडणुकीमुळे संमेलन अध्यक्षपदाची गरिमा संपते
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची खंत : कोमसाप युवा साहित्य संमेलनाला उत्साहात सुरुवात
ठाणे, ता. १२ (बातमीदार) : साहित्य अथवा नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाला विराजमान करायचे, यासाठी होणाऱ्या निवडणुकांमुळे या पदाची गरिमा संपते, पण कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाने बिनविरोध अध्यक्ष निवडून एक नवीन पायंडा घातला आहे. हे चांगले लक्षण असून तरुण पिढीमध्ये वाचन संस्कृती वाढावी, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात युवा साहित्य संमेलन झाले पाहिजे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले. या वेळी त्यांनी पुढील कोमसापच्या राष्ट्रीय युवा साहित्य संमेलन आपल्या रत्नागिरी मतदारसंघात आयोजित करण्यात यावे, यासाठी आयोजकांना निमंत्रित केले.
कोकण मराठी साहित्य परिषद आणि ठाणे महानगरपालिका आयोजित दुसऱ्या राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाला आजपासून (ता. १२) सुरुवात करण्यात आली. ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात होत असलेल्या दोन दिवसीय युवा साहित्य संमेलनाचे उद्घाटन राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर, कोमसापचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक, संमेलनाचे अध्यक्ष प्रणव सखदेव, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्वागत अध्यक्ष नरेश म्हस्के, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालिका शालिनी इंगोले, विलास जोशी, कोसमाप केंद्रीय कार्याध्यक्ष प्रवीण ढवळ, कोसमाप केंदीय अध्यक्ष नमिता किर, कमलेश प्रधान, विलास ठुसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
तरुण पिढीने आयटीमध्ये गेले पाहिजे, इंजिनिअरिंग झाले पाहिजे, परंतु याच तरुण पिढीने महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचे कामही साहित्याच्या माध्यमातून सुरू ठेवले असून तरुण पिढी यामध्ये सहभागी होत आहे, हे चांगल्याचे द्योतक आहे. हे विचार सर्वांपर्यंत पोहचावयचे असतील, तर प्रत्येक जिल्ह्याच्या पातळीवर अशी संमेलने होणे गरजेचे आहे. साहित्य संमेलन झाले म्हणजे आपली जबाबदारी संपली असे नाही, तर आपली जबाबदारी वाढली हे लक्षात ठेवा. तरुणांना भविष्यात काय देणार आहोत, हे लक्षात घेतले पाहिजे, असे सांगत चांगली पुस्तके महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाठवण्याची जबाबदारी स्वीकारत असल्याचेही संमेलनाचे प्रमुख पाहुणे उदय सामंत यांनी सांगितले.
निदान साहित्य संमेलनाची फाईल रखडवू नका
विद्यापीठात दरवर्षी युवा साहित्य संमेलन झाले पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्नही करणार आहोत, परंतु साहित्य संमेलन घ्यायचे झाल्यास त्याची परवानगी राज्यपालांकडे घ्यावी लागते. त्यासाठी राज्यपालांकडे प्रस्ताव पाठवेन, परंतु हल्ली तेथे फाईल गेल्यावर जास्त दिवस थांबते, हा आमचा अनुभव आहे. त्यामुळे वेळप्रसंगी मधु मंगेश कर्णिक यांना घेऊन जाईन, म्हणजे किमान साहित्याची तरी फाईल जास्त वेळ ठेवू नये अशी विनंती आपण करू, अशी मार्मिक टीका सामंत यांनी केली.
साहित्य दिंडी, फिरते ग्रंथालय
ठाणे शहरातून सकाळी साहित्य दिंडी काढण्यात आली होती. यात शहरातील शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी, तसेच साहित्यिक पारंपरिक वेशात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यात पालखीसोबत विद्यार्थ्यांनी मराठमोळे लेझीम पथक, ढोल-ताशा पथक, साहसी खेळ इत्यादींचे लक्षवेधी सादरीकरण केले. साहित्याचा प्रचार-प्रसार व्हावा यासाठी मराठी ग्रंथसंग्रहालयाचे फिरते ग्रंथयानदेखील या साहित्य दिंडीत सहभागी झाले होते. साहित्य दिंडी संपन्न झाल्यावर जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शन आणि रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. रांगोळी प्रदर्शनात मराठी साहित्यातील पुस्तकांची मुखपृष्ठे कलाकारांनी रांगोळीच्या माध्यमातून साकारली होती.
मराठी अभिजात भाषेसाठी १० हजार पत्रांचा बस्ता
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा, या मागणीसाठी युवा साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ७५ हजार पोस्टकार्ड राष्ट्रपतींना पाठवण्याची मोहीम कोसमापच्या वतीने राबवण्यात आली होती. या मोहिमेचा १० हजार पात्रांचा शेवटचा बस्ता जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते जीपीओच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला. मराठी भाषा ही सर्वार्थाने श्रेष्ठ आणि समृद्ध आहेच, तेव्हा तिला लवकरात लवकर अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी मागणी यानिमित्ताने जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी केली.
साहित्यप्रेमींना अनोखी मेजवानी
संमेलनाच्या पहिल्या दिवशी पुस्तक गप्पा (आम्ही साहित्य पालखीचे भोई), युवाकवींचे काव्य संमेलन, मायमराठी एंटरटेन्मेंट ते इन्फॉरटेन्मेन्ट या विषयवार परिसंवाद, कट्टी बट्टी - बालभारती पाठ्यपुस्तकातील कवितांचे रंगमंचीय आविष्कार, अभिवाचन आणि कथाकथन, बहुभाषिक काव्यसंमेलन ‘मेरे कवी दोस्त’, कोसमाप : काव्य कट्टा झपूर्झा, नवोदित कवींचा काव्य कट्टा इत्यादी कार्यक्रम पार पडले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..