
हिमोफिलिया रुग्णांसाठी जीनथेरपी संजीवनी ठरेल!
प्रभादेवी, ता. २१ (बातमीदार) : हिमोफिलिया आजाराचे रुग्ण सध्या उपलब्ध असलेले उपचार घेतले तरीदेखील पूर्णतः बरा होईल याची शाश्वती नसते, मात्र जीनथेरपीच्या आधारे अशा रुग्णांना दिलासा मिळणार असून ही थेरपी त्यांच्यासाठी संजीवनी ठरू शकेल, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.
जागतिक हिमोफिलिया दिनाचे औचित्य साधत के. जे. सोमय्या मेडिकल कॉलेज-रुग्णालय आणि रिसर्च सेंटर व हिमोफिलिया सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (ता. २०) सायन येथील के. जे. सोमय्या आयटी सभागृहात जीनथेरपी व हिमोफिलिया आजाराबाबत मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ही माहिती देण्यात आली. या वेळी सुप्रसिद्ध गायक सोनू निगम, सोमय्या ग्रुपचे अध्यक्ष समीर सोमय्या, डॉ. वर्षा फडके, डॉ प्रशांत कुमार, डॉ. शर्मिता शेट्टी, अजय पालांडे, परेश परमार आदी उपस्थित होते.
विदेशात जीन थेरपी प्रयोग यशस्वी झाला असून भारतात प्रथमच मुंबई येथील सोमय्या रुग्णालयात जीनथेरपीवर लवकरच संशोधन करून प्रयोग करण्यात येणार असल्याचे डॉ. श्रीमती शेट्टी यांनी सांगितले. यासाठी सोमय्या रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर हिमोफिलिया उपचार केंद्र संशोधन केंद्र, जीनथेरपी केंद्र व प्रयोगशाळा साकारण्यात आली आहे.
...
जीनच्या माध्यमातून मदत...
हिमोफिलिया आजारात रक्तस्राव थांबण्यासाठी रुग्णांना फॅक्टर ८ व फॅक्टर ९ घ्यावे लागते. रुग्णांच्या शरीरात आवश्यक व पोषक असणारे हे घटक तयार करण्यासाठी जीनच्या माध्यमातून मोठी मदत मिळणार आहे. त्यामुळे हा आजार बरा होऊन रुग्णांना दिलासा मिळणार असल्याचेही या वेळी सांगण्यात आले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..