
मिरा-भाईंदर पालिका परिवहनची भाडेवाढ?
भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेच्या प्रवासी भाड्यात फेररचना करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. त्यानुसार सर्वसाधारण बसच्या भाड्यात वाढ होणार आहे, तर वातानुकूलित प्रवास मात्र स्वस्त होणार आहे. गेल्या नऊ वर्षांत महापालिकेने प्रवासी भाड्यात कोणतीही वाढ केलेली नाही. मात्र डिझेलचे भाव गगनला भिडल्याने तसेच इतर महापालिकांच्या तुलनेत मिरा-भाईंदर परिवहन सेवेचे दर कमी असल्याने ही वाढ प्रस्तावित करण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. हा प्रस्ताव २९ एप्रिलला होणाऱ्या महासभेत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.
डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसांत प्रचंड वाढ झाली आहे. तसेच सुट्या भागांच्या किमतीही सातत्याने वाढत आहेत. दुसरीकडे ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार या पालिकांच्या परिवहन सेवेच्या दरांशी तुलना केली तर मिरा-भाईंदर परिवहन सेवेतील सर्वसाधारण बसचे प्रवासी भाडे कमी आहे; तर वातानुकूलित बस सेवेचे भाडे जास्त आहे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने भाड्यात फेररचना करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. येत्या २९ एप्रिलला होणाऱ्या महासभेपुढे तो मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. महासभेने मान्यता दिल्यानंतर हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी मुंबई प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे पाठवण्यात येणार आहे.
मिरा-भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेतील सर्वसाधारण बसचे प्रवासी भाडे पहिल्या दोन किलोमीटरपर्यंत ६ रुपये आहे; तर ठाणे, नवी मुंबई आणि वसई-विरार महापालिकांच्या परिवहन सेवेचे पहिल्या दोन किलोमीटरपर्यंतचे भाडे अनुक्रमे ७ रुपये, १० रुपये आणि ७ रुपये इतके आहे. पहिल्या टप्प्यासाठी प्रवासी भाडे १० रुपये करण्याचे प्रशासनाने प्रस्तावित केले आहे. मिरा-भाईंदर परिवहनच्या बसच्या शेवटच्या टप्प्यातील भाडे सध्या ३२ रुपये इतके आहे. याच टप्प्यासाठी इतर महापालिकांचे प्रवासी भाडे ३६ रुपये, ५० रुपये आणि ४५ रुपये इतके आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यासाठी ४५ रुपये इतके भाडे प्रस्तावित करण्यात आले आहे.
एसीचे दर कमी करण्याचा प्रस्ताव
वातानुकूलित बसचे प्रवासी भाडे कमी करण्याचे प्रशासनाने प्रस्तावित केले आहे. सध्या वातानुकूलित बसचे किमान भाडे २० रुपये आणि कमाल भाडे १०० रुपये इतके आहे. त्या तुलनेत नवी मुंबई महापालिकेचे किमान भाडे १० रुपये आणि कमाल भाडे ६५ रुपये, तर ठाणे पालिकेच्या एसी सेवेचे किमान भाडे २० रुपये आणि कमाल भाडे १०५ रुपये आहे. या पार्श्वभूमीवर मिरा-भाईंदरचे प्रवासी भाडे किमान १५ आणि कमाल ८५ रुपये इतके कमी करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव आहे.
उत्पन्न वाढीसाठीही प्रयत्न
भाड्यात फेररचना करण्यासोबतच पालिकेने परिवहन सेवेचे उत्पन्न वाढवण्याचाही प्रस्ताव तयार केला आहे. पालिकेच्या बस भाडे तत्त्वावर देणे, बसडेपो तसेच इतर सामग्री मालिका, चित्रपटांच्या चित्रिकरणासाठी भाडे तत्त्वावर देणे यातून परिवहन सेवेला उत्पन्न मिळणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. या भाडेतत्त्वासाठी आकारायच्या दरांचा प्रस्तावही प्रशासनाने महासभेपुढे दिला आहे.
सर्वसाधारण बस भाडे २०१३ मध्ये लागू करण्यात आले होते; तर वातानुकूलित बसचे प्रवासी भाडे २०१६ मध्ये निश्चित करण्यात आले. गेल्या १३ वर्षांत झालेली डिझेल दरवाढ आणि इतर खर्च यामुळे प्रवासी भाड्याच्या दराची फेररचना करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
- विजयकुमार म्हसाळ, अतिरिक्त आयुक्त, मिरा-भाईंदर महापालिका.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..