वसईकर महिलांचा दुबईत डंका
वसई, ता. २४ (बातमीदार) : वसई-विरार शहरातील अनेक महिला घरगुती वस्तू तयार करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावत आहेत. याच महिलांनी आता जिद्द, मेहनतीच्या जोरावर दुबई, मॉरिशियस या देशांत भरवण्यात आलेल्या वस्तू प्रदर्शनात भाग घेऊन वसईचा झेंडा रोवला. या महिलांनी स्वतः तयार केलेल्या विविध वस्तूंची विक्री प्रदर्शनात केली. त्यातून लाखो रुपयांचे उत्पन्नही त्यांना मिळाले. आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा अनुभव पाठिशी घेऊन भविष्यात स्वतः बनवलेल्या वस्तू देशाबाहेर विक्री करून उद्योग विस्तार करण्याचा निर्धार या महिला उद्योजिकांनी केला आहे.
काही दिवसांपूर्वी वसईच्या २० महिलांनी दुबई येथे भारतीय कपडे, आभूषणे, बॅग, कापडी पिशव्या यासह विविध वस्तूंची विक्री करण्यासाठी प्रदर्शनात सहभाग घेतला होता. दुबईच्या नागरिकांनी याला भरघोस प्रतिसाद देत वस्तू खरेदी केल्या आणि त्यांचे कौतुकही केले. प्रदर्शनातून महिलांना एकूण चार लाखांची कमाई झाली. या प्रदर्शनात महिलांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मार्केटिंग, उद्योग, वैशिष्ट्ये याबाबत दुबई येथील अनेक उद्योजकांचे मार्गदर्शन लाभले. यापूर्वी मॉरिशियस येथे २०१९ मध्ये वसईच्या महिलांनी वस्तू प्रदर्शनात भाग घेतला होता. त्यावेळी एक लाख ६० हजार रुपयांच्या मालाची विक्री झाली होती. दुसऱ्या टप्प्यात दुबईमधील प्रदर्शनात दुप्पट उत्पन्न मिळाल्याने महिलांना प्रोत्साहन मिळाले आहे.
‘समृद्धी’ महिला बचत गटाच्या अध्यक्षा किरण बडे यांच्या नेतृत्वाखाली या महिलांना बाहेर देशात जाण्याची संधी मिळाली. वसई-विरारमध्ये राहणाऱ्या या महिलांपैकी अनेकांना कोणाचा आधार नाही, तर काहींचे कर्ते पुरुष नाहीत. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने कौटुंबिक जबाबदारी सांभाळून त्या उद्योग जगतात पाऊल टाकत आहेत. या महिलांचे आर्थिक जीवनमान उंचावर नेण्याचे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करत असल्याचे किरण बडे यांनी सांगितले.
महिलांना मदतीची हाक
दुबईमध्ये अनेक संस्था, नागरिकांनी महिलांना उद्योगात मदत करण्याची हाक दिली आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या वस्तूंची माहिती आणि छायाचित्र पाठवून त्याद्वारे मालाची विक्री केली जात आहे. याकरिता ई-मेल आयडीचा देखील वापर करून महिलांना प्रशिक्षण देऊन वस्तूंची किंमत पाठवली जाणार आहे. सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने अधिकाधिक विक्रीतून अर्थार्जन वाढण्याच्या महिलावर्गाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात वस्तू विक्री करण्याचा अनुभव चांगला आहे. दोन्ही देशांतील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. अन्य देशांत भारतीय वस्तूंसाठी प्रदर्शन भरविण्याचा मानस आहे. महिलांचे सक्षमीकरण होण्यास यामुळे निश्चितच फायदा होत आहे.
- किरण बडे, अध्यक्षा, समृद्धी महिला बचत गट.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.