कोपरखैरणेत चोरट्यांचा हैदोस

कोपरखैरणेत चोरट्यांचा हैदोस

Published on

नवी मुंबई, ता. २४ (वार्ताहर) : बंद घरे हेरून घरफोड्या करणाऱ्या टोळ्यांनी सध्या कोपरखैरणेत हैदोस घातला आहे. या टोळ्यांनी आठवडाभरात कोपरखैरणेतील विविध भागांत पाच ठिकाणी घरफोडी करून तब्बल नऊ लाख ४२ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरल्‍याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे यातील बहुतेक घरफोड्या दिवसा झाल्या असून अवघ्‍या अर्धा तासाच्या कालावधीत झाल्या आहेत. घरफोड्यांचे हे सत्र वाढत असल्याने नागरिकांमध्ये या चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे.
कोपरखैरणे सेक्टर-१७ मधील एस एस-२ वसाहतीत राहणाऱ्या अलका रामदास कोळेकर (५०) यांचे पती रामदास कोळेकर हे २० एप्रिल रोजी सकाळी सात वाजता नेहमीप्रमाणे रिक्षा चालवण्यासाठी गेले होते. त्यानंतर अलका सकाळी सव्वा दहाच्या सुमारास विजेचे बिल भरण्यासाठी गेल्या होत्या. त्‍या दरम्यान चोरट्याने त्यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून घरातील एक लाख ३३ हजार रुपये किमतीचे दागिने चोरले. अलका अर्ध्या तासाने घरी परतल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्याच कालावधीत कोपरखैरणे सेक्टर-१२-बी मधील स्वस्तिक व्हिला सोसायटीत चोरट्यांनी घरफोडी करून सुनीता बाळासाहेब भालेराव (४४) यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून ९५,५०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम पळवली.
१८ एप्रिल रोजी कोपरखैरणे सेक्टर-७ मध्ये रवींद्र हनुमंत गोरड (३४) यांच्या घरातील सुमारे पावणे दोन लाख रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम चोरण्यात आली. गोरड १८ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजता ऐरोली येथे कामावर गेले होते; तर त्‍यांची पत्‍नी करिष्मा सव्वा दहाच्या सुमारास मुलीचे ॲडमिशनसाठी शाळेत गेली होती. याचदरम्यान चोरट्याने त्यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून सुमारे पावणे दोन लाख रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम पळवली. करिष्मा ११.३० वाजता घरी परतल्‍यावर चोरी झाल्याचे त्‍यांच्या निदर्शनास आले. चोरट्याने त्याच इमारतीत दुसऱ्या माळ्यावर राहणाऱ्या स्वप्नील कोंडीराम रांजणे (२९) यांच्या घराचाही कडी-कोयंडा तोडून ३६,५०० रुपये किमतीचे दागिने पळवले.
कोपरखैरणे सेक्टर-२ मधील एसएस-२ टाइपच्या घरात राहणारा कमलेश मानबहादूर चंद (३१) हा १० एप्रिल रोजी नातेवाइकांच्या लग्नकार्यासाठी कुटुंबासह गावी गेला होता. लग्न समारंभ आटोपून तो १९ एप्रिल रोजी सकाळी घरी परतला असता, घरात चोरी झाल्याचे तसेच घरातील १ लाख ६६ हजार रुपये किमतीचे दागिने व इतर वस्‍तू गायब असल्‍याचे त्‍याच्या लक्षात आले.

कडी-कोयंडा तोडून चोरी
कोपरखैरणे सेक्टर-१ मधील एस.एस टाईप-२ च्या घरात राहणाऱ्या हेमलता हळदणकर (४२) या १२ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता मुलगा ओम याला शाळेत, तर मुलगी अक्षरा हिला सकाळी ९ वाजता खासगी शिकवणीला घेऊन गेल्या होत्या. यादरम्यान चोरट्याने त्यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून तब्बल ३ लाख ३६ हजारांचे दागिने व रोख रक्कम पळवली. सव्वा अकराच्या सुमारास हेमलता हळदणकर घरी आल्या असता चोरी झाल्याचे त्‍यांच्या लक्षात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com