कोरोनाकाळातील मदत साभार परत
श्रीकांत खाडे ः सकाळ वृत्तसेवा
अंबरनाथ, ता. २३ ः दोन वर्षांपूर्वी कोरोनाचा शिरकाव झाला आणि सर्वत्र एकच हाहाकार उडाला. वाढती रुग्णसंख्या, वैद्यकीय सेवांचा अभाव, बेड नाही, व्हेंटिलेटर नाही... अशा वेळी अंबरनाथ नगरपालिकेच्या मदतीला शेकडो दात्यांचे हात पुढे आले आणि अल्पावधितच शहरामध्ये सक्षम आरोग्य सुविधांचा महामेरू उभा राहिला. त्याचे फलित म्हणजे अंबरनाथ शहर आज पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे कोरोनाकाळातील कठीण प्रसंगात मदतीला धावून आलेल्या दात्यांचे आभार मानत त्यांनी दिलेल्या वस्तू त्यांना ‘साभार’ परत करण्याचा निर्णय अंबरनाथ नगरपालिकेने घेतला आहे.
लाटांवर लाटा धडकल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव आता शांत झाला आहे. मात्र, दोन वर्षांपूर्वी याच कालावधीमध्ये परिस्थिती फार भयावह होती. अंबरनाथ शहरही त्याला अपवाद नव्हते. उलट नगरपालिकेकडे स्वतःचा आरोग्य विभागच नसल्याने कुठून सुरुवात करायची, याचाच प्रश्न सतावत होता. त्याच कालावधीमध्ये या शहराला डॉक्टर मुख्याधिकारी लाभला. डॉ. प्रशांत रसाळ यांनी अंबरनाथचा चार्ज घेताच सर्वप्रथम येथे कोव्हिड रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, शहरप्रमुख अरविंद वाळेकर, जिल्हा वैद्यकीय अधिकारी, शहरातील डॉक्टर्स आदींच्या सहकार्यातून चिखलोली येथील शान एज्युकेशन सोसायटीच्या दंत महाविद्यालयात कोव्हिड केअर सेंटर आणि कोव्हिड हेल्थ सेंटरची उभारणी करण्यात आली. या रुग्णालयासाठी त्या काळात अनेक दात्यांचे हात मदतीसाठी धावून आले.
अंबरनाथ एमआयडीसीतील काही उद्योजकांनी बेडस् दिले, कुणी चादरी, गाद्या दिल्या, कुणी औषधे; तर कुणी व्हेंटिलेटर. एका निवृत्त वृद्धाने तर आपल्याला आयुष्यभराच्या पुंजीमध्ये कर्ज काढून व्हेंटिलेटर दिला. ज्याला जशी जमेल तशी मदत करण्याची धडपड त्या काळात सुरू होती. या दात्यांच्या माणुसकीमुळेच अंबरनाथ नगरपालिकेसमोर उभा असलेला आरोग्य सुविधांचा भार मोठ्या प्रमाणात हलका झाला; मात्र आता कोरोना पूर्णपणे आटोक्यात आल्यानंतर लाखमोलाच्या या सर्व वैद्यकीय वस्तू अडगळीत पडल्या आहेत. यूपीएससी सेंटर आणि अग्निशमन दलाच्या वास्तूत त्यांची साठवणूक करण्यात आली असली, तरी कालांतराने वापराविना त्या खराब होण्याची शक्यता आहे. या वस्तू गरजूंच्या उपयोगात याव्यात, यासाठी त्या पुन्हा दात्यांना परत करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. ही वैद्यकीय उपकरणे दात्यांनी परत घ्यावीत आणि समाजोपयोगी कामासाठी वापरावीत, असे आवाहन पालिकेने केले आहे.
खातरजमा करूनच वस्तू परत
प्रशासनाने वैद्यकीय उपकरणांची यादी तयार करून ती वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध केली आहे. त्यानंतर अनेक दात्यांनी नगरपालिकेशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. सर्व बाजूने खातरजमा केल्यानंतरच वैद्यकीय उपकरणे आणि वस्तू भंडार विभागामार्फत संबंधित दात्यांना परत केली जात असल्याचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी सांगितले. तसेच, चादरी, उशा, गाद्या अशा काही वस्तू सामाजिक संस्थांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सामाजिक दायित्व आणि कर्तव्याचा आविष्कार कोरानाकाळात घडला. दानशूर दाते नसते, तर महामारी आटोक्यात आणणे अशक्य होते. त्यामुळे त्यांच्या दायित्वाची जाण सदैव स्मरणात आणि प्रेरणादायी राहील.
- डॉ. प्रशांत रसाळ, मुख्याधिकारी, अंबरनाथ नगरपालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.