
महाराष्ट्राच्या ‘महाउत्सव’ जगभरात साजरा होणार
बदलापूर, ता. २३ ः कर्जत येथील प्रसिद्ध एन. डी. स्टुडिओ येथे २८ एप्रिल ते १ मे दरम्यान ‘महाराष्ट्राचा महाउत्सव’ या कार्यक्रमाचे आयोजन प्रसिद्ध कला दिग्दर्शक व एन. डी. स्टुडिओचे संस्थापक नितीन चंद्रकांत देसाई यांनी केले आहे. महाराष्ट्राच्या गौरवगाथेचा व लोककलेचा अवघ्या जगाला हेवा वाटावा व महाराष्ट्राचा महाउत्सव जगभरात पाहिला जावा, हा हेतू या आयोजनामागे असल्याचे देसाई म्हणाले.
कोरोना काळात चित्रपटसृष्टीतील अनेक हरहुन्नरी कलाकार हरपले. रमेश देव, लता मंगेशकर यांच्यासारख्या दिग्गजांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली. या महान कलाकारांच्या आठवणी ताज्या करण्यासाठी व त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी महाराष्ट्राचा महाउत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे देसाई यांनी सांगितले. या वेळी विविध कलाकारांचे कार्यक्रम, मराठी चित्रपट संगीत, महाराष्ट्राची ऐतिहासिक लोककला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावरील कार्यक्रम, समाज सुधारकांचा महाराष्ट्र, महाराष्ट्राचे वैशिष्ट्य, महाराष्ट्राची संत परंपरा, शास्त्रीय संगीत महोत्सव, लोकवाद्य महोत्सव, महाराष्ट्रातील विविध प्रांतांतील खाद्य मेळावा, हस्तकला, लोककलाकारांचा मेळावा, १०० वर्षांचा मराठी चित्रपट प्रवास अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे १ मेच्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीबाबतचे कार्यक्रम, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांची तसेच राज्यातील ऐतिहासिक, सामाजिक, भौगोलिक व सांस्कृतिक वैशिष्ट्यांची परिपूर्ण माहिती सांगणारे कार्यक्रम सादर केले जाणार असल्याचे आयोजक नितीन चंद्रकांत देसाई यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..