
कोरोना पुन्हा डोकावतोय
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ ः ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरी भागात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर निर्बंधात शिथिलता आली आहे. त्यामुळे नागरिकांनी मोकळा श्वास घेण्यास सुरुवात केली. मात्र, हे करत असताना लोकांना कोरोना नियमांचा विसर पडला असल्याचे दिसून येत आहे. त्यातच ठाण्यात मागील तीन ते चार दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या काहीशी वाढताना दिसत आहे. ठाणे शहरातील रुग्णवाढीचा दर १.७१ टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे ठाणेकरांनी काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. सध्या तरी व्हेंटिलेटरवर एकही रुग्ण नसून आयसीयूमध्ये अवघे चार रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती आहे.
ठाणे जिल्ह्यातील शहरी भागात कोरोनाने मागील दोन ते अडीच वर्षे थैमान घातले होते. पण, मागील काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने निर्बंध शिथिल झाले आहे. त्यामुळे नागरिकांचे सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मागील काही दिवसांपूर्वी रुग्णवाढीचे प्रमाण २ ते ४ एवढेच असल्याचे दिसत होते. परंतु, आता कोरोनाच्या रुग्णांत पुन्हा एकदा काही प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. महापालिका हद्दीत मागील दोन दिवसात १५ आणि १६ रुग्ण नव्याने आढळले आहेत.
सध्या महापालिका हद्दीत रोज २५० ते २८०च्या आसपास कोरोना चाचण्या होत आहेत. त्यातून १५ ते १६ रुग्णांना कोरोनाची लागण होत आहे. पॉझिटिव्हिटी रेट हा १.७१ टक्के एवढा आहे; तर दिवसाला ५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या ४२ रुग्णांवर प्रतक्षात उपचार सुरू असून त्यातील ३८ रुग्णांवर घरीच उपचार सुरू आहेत. चार रुग्णांवर रुग्णालयात आयसीयुमध्ये उपचार सुरू आहेत; मात्र मागील काही दिवसांत नव्याने रुग्णांचा मृत्यू झालेला नाही. आतापर्यंत १ लाख ८३ हजार ७३९ जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यातील १ लाख ८१ हजार ५७० जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे; तर २ हजार १२७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
.....
५८ हजार जणांना बुस्टर डोस
ठाणे महापलिका हद्दीतील १६ लाख ५१ हजार जणांनी कोरोनाची पहिली लस; तर १३ लाख ८५ हजार ४० जणांनी कोरोनाची दुसरी लस घेतली आहे; तर ५८ हजार २७९ जणांनी बुस्टर डोस घेतला असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..