
लिंबू सरबतही महागले
म्हसळा, ता. २४ (बातमीदार) : उकाड्याने अंगाची लाहीलाही होत असताना वाढत्या पार्याप्रमाणे लिंबाचेही भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. किराणा मालासह तेल, तसेच भुसारी, डिझेलनंतर लिंबानेही आता भाव खाल्ला आहे. काही दिवसांत दुपटीने भाववाढ होऊन प्रति शेकडा लिंबाचा भाव १००० ते १२०० रुपये झाला आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांनी लिंबाकडे पाठ फिरवली आहे.
काही दिवसांपासून लिंबाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात एक लिंबू १२ ते २० रुपयांना विकले जात आहे. ग्राहकांनी वाढलेल्या किमतीमुळे लिंबू घेणेच बंद केले असल्याचे एका विक्रेत्याने सांगितले. काही दिवसांपूर्वी ११०० रुपयांना लिंबाची गोणी होती. आता त्या गोणीची किंमत ७५oo ते ८००० रुपये झाल्याचे विक्रेत्याने सांगितले. उन्हाळ्यात लिंबाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यातच पवित्र रमजान सुरू असल्याने सरबतासाठी लिंबाला मोठी मागणी असते. उसाचा रस विक्रेत्यांनी, आम्ही घाऊक खरेदी करत असल्याने एक लिंबू साधारणतः ५ ते ६ रुपयांना मिळतो. त्यामुळे उसाच्या रसात लिंबू टाकताना कोणतीही काटकसर करत नसल्याचे सांगितले.
सरबत विकणे बंद
अनेक विक्रेत्यांनी तर लिंबाचे सरबत बंद केल्याचे सांगितले. किरकोळ बाजारात जर लिंबू १० ते १५ असेल, तर सरबत ३० रुपयांना विकण्याची वेळ येऊ शकते. लिंबू सरबतचे भाव वाढवल्याने अनेकदा ग्राहकांसोबत भांडणे होत असतात. परिणामी, नाईलाजाने लिंबू सरबत विकणे बंद करणेच पसंत केल्याचे सरबत विक्रेत्यांनी सांगितले.
ग्राहक पैशांचा विचार करत नाही.
उसाचा रस १० रुपये हाफ, तर १५ रुपये फुल ग्लास दराने विक्री होतो. मात्र, वाढलेल्या इंधन आणि लिंबाच्या दराने आता २० रुपये हाफ, तर ३० रुपये फुल या दराने उसाच्या रसाची विक्री होत आहे. मात्र, अंगाची लाहीलाही होत असल्याने ग्राहक पैशांचा विचार न करता उसाच्या रसावर तहान भागवत आहेत, असे उस रस विक्रेत्याने सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..