कचरा कुंडी लगतचे वारकरी संप्रदायाचे शिल्प मनसेने हटविले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कचरा कुंडी लगतचे वारकरी संप्रदायाचे शिल्प मनसेने हटविले
कचरा कुंडी लगतचे वारकरी संप्रदायाचे शिल्प मनसेने हटविले

कचरा कुंडी लगतचे वारकरी संप्रदायाचे शिल्प मनसेने हटविले

sakal_logo
By

वाशी, ता. २४ (बातमीदार) : स्वच्छ भारत अभियानांतर्गत नवी मुंबई पालिका क्षेत्रातील दिघा विभागातील प्रभाग क्रमांक-१, ईश्वरनगर येथे कचरा पेटीलगत वारकरी संप्रदायाची माहिती सांगणारा देखावा उभारण्यात आला होता. यानंतर वारकरी मंडळी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करीत शिल्परुपी देखावा हटविण्याची मागणी केली होती. मात्र, मुदत देऊनही शिल्प न हटविल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सदरचे शिल्‍प काढून दिघा विभाग कार्यालयात आणून मनसे स्टाईल आंदोलन केले.
दिघा विभागात स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत प्रभाग १ मधील ईश्वरनगर, सिद्धी विनायक मंदिराजवळ कचराकुंडी लगतच पालिकेने महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाची परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन देणारा देखावा उभारला होता. सदर ठिकाणची कचराकुंडी हटवा किंवा शिल्प हटवा, अशी मागणी विभागाचे सहायक आयुक्त मनोहर गांगुर्डे यांच्याकडे निवेदन देऊन केली होती. पालिकेचे स्वच्छता अधिकारी राजू बोरकर, अधिकारी सनदी, अभियंता अजय पाटील यांच्याकडे पर्यायी मार्ग काढण्याची मागणी केली होती. पालिकेने सदर ठिकाणचा कचरा हटवून आणि शिल्पालगत झाडांच्या कुंड्या लावत दिखावा केला; परंतु शिल्प हटविले नाही. पालिकेचे नियोजन नसल्याने वारकरी संप्रदायाचा माहितीपर देखावा कचराकुंडी जवळून काढून दिघा विभाग कार्यालयात आणला. त्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. पालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगूनही जर कोणत्याही प्रकारे न्यायिक भूमिका घेतली जात नसेल तर यापुढे देखील सामाजिक विषयांवर मनसे स्टाईल आंदोलन सुरू राहील, असा इशारा मनसेचे दिघा विभाग अध्यक्ष भूषण आगिवले यांनी दिला.
कोट
स्वच्छ भारत मिशननुसार कचराकुंडी मुक्त शहर ही संकल्पना राबविण्यात येत असल्याने या ठिकाणी कचरा साठवला जात नाही. वारकरी संप्रदायाचा कोणताही अवमान पालिकेने केलेला नाही. शिल्पासाठी चांगल्या जागेचा शोध घेण्याचे वरिष्ठांना कळविण्यात आले आहे. जागा नियोजित झाल्यानंतर शिल्प बसविण्यात येईल.
- मनोहर गांगुर्डे, सहायक आयुक्त, दिघा विभाग.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top