भोंग्यांद्वारे ग्रामजागृती
वसंत जाधव ः नवीन पनवेल
राज्यात एकीकडे मशिदींवरील भोंगे काढण्यावरून वादंग निर्माण झाला आहे, तर दुसरीकडे हेच भोंगे तालुक्यातील शिवकर गावामध्ये जनजागृतीचे साधन बनले आहेत. गावात लावलेल्या सहा स्पीकरमधून गावकऱ्यांना शासनाच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती, तसेच अत्यावश्यक सूचना दिल्या जातात.
पूर्वी पारंपरिक पद्धतीचे भोंगे वेगवेगळे कार्यक्रम, सण-उत्सव तसेच गावात सूचना देण्यासाठी लावले जायचे. मात्र आता त्यांचे स्वरूप बदलले आहे. आजही अनेक धार्मिक स्थळ आणि प्रार्थनालयांवर भोंगे लावले जातात; परंतु सार्वजनिक ठिकाणी भोंगे वाजवण्यास मनाई आहे. विशेषकरून रात्री आणि पहाटे भोंग्यांच्या आवाजाला मनाई आहे. याच मुद्द्यांवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रान पेटवले आहे. मशिदींवरील भोंगे काढण्यात यावेत, अन्यथा त्यासमोर हनुमान चालिसा म्हणण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. यावर राजकीय, सामाजिक, धार्मिक स्तरावरून विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. हे एकीकडे भोंग्यांवरून राजकारण सुरू असताना, शिवकर गावात मात्र सामाजिक संदेश, स्वच्छतेबाबत संदेश, ग्रामस्थांना सूचना देण्यासाठी भोंगे लावले आहेत. सरपंच अनिल ढवळे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. आयएसओ नामांकन प्राप्त शिवकर गावाला निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला आहे. स्वर्गीय आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्काराबरोबरच तालुका व जिल्हा स्तराच्या दोन्ही पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. याव्यतिरिक्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान तालुका व जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक गावाने प्राप्त केला आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान विशेष पुरस्कार कोकण विभाग, वसंतराव नाईक सांडपाणी व्यवस्थापन पुरस्कार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, बाबासाहेब खेडकर पुरस्कार सरपंच अनिल ढवळे यांना रायगड भूषण पुरस्कार नुकताच प्राप्त झाला आहे.
पनवेल तालुकाच नव्हे तर रायगड जिल्ह्यातील आदर्श गावांमध्ये वर्षभर वेगवेगळ्या सरकारी योजना राबवल्या जातात. त्याबाबत माहिती देण्यासाठी ग्रामपंचायतीने सहा ठिकाणी भोंगे लावले आहेत. राज्य व केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजनांची इत्थंभूत माहिती भोंग्यांद्वारे ग्रामस्थांना दिली जाते. याकरिता आवश्यक कागदपत्रे, योजनेचा लाभ कसा घ्यायचा, याबाबत सूचना सहा भोंग्याद्वारे दिली जाते. नैसर्गिक आपत्तीविषयी सतर्कतेचा इशारा दिला जातो. भोंग्यांच्या माध्यमातून ग्रामस्थांशी संपर्क साधला जातो. शासनाच्या नियमानुसार, आवाजाची मर्यादा ओलांडली जात नाही. ठरवून दिलेल्या डिसेबलप्रमाणे भोंगे वाजवले जातात.
भोंग्यांवर दवंडी!
पूर्वी गावांमध्ये दवंडी दिली जायची, आता पारंपरिक पद्धत राहिली नाही. शिवकर गावाने दवंडीची पद्धत आणि परंपरा पुढे चालू ठेवली आहे. सहा ठिकाणी भोंगे लावून वेगवेगळी माहिती ग्रामस्थांपर्यंत पोहोचवली जाते. पाचशे उंबराच्या, अडीच हजार लोकवस्तीच्या या गावांत सहा भोंग्यांद्वारे दवंडी दिली जाते.
पनवेलपासून सहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शिवकर गावामध्ये नेहमीच विकासाच्या वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. वेगवेगळ्या पुरस्काराने गावाला सन्मानित करण्यात आले आहे. योजना व ग्रामपंचायतीचा कारभार समजण्यासाठी गावामध्ये मुख्य चौकात डिजिटल स्क्रीन बसवण्यात आली असून माहिती दिली जाते. त्याचबरोबर शिवकर गावात सहा भोंगे बसवण्यात आले आहेत. त्या माध्यमातून योजनांची माहिती आणि वेगवेगळ्या सूचना आणि संदेश दिले जातात. ग्रामसुधाराकरिता हे माध्यम अत्यंत प्रभावी ठरत आहे.
- अनिल ढवळे, सरपंच, शिवकर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.