
जिल्हा परिषद शाळांचा वीज पुरवठा पुर्ववत
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २४ ः थकबाकीमुळे वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित करण्यात आलेल्या जिल्हा परिषदांच्या शाळा पुन्हा प्रकाशमान झाल्या आहेत. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने वीजबिलाची थकबाकी भरण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली. त्यामुळे महावितरणने एक पाऊल पुढे टाकत कल्याण परिमंडळात येणाऱ्या ठाणे व पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ३४४ शाळांचा वीजपुरवठा पुन्हा जोडला आहे.
वीजबिलांची थकबाकी वाढल्याने जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित करण्यात आला होता. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या शाळांच्या थकीत वीजबिलापोटी १४ कोटी १८ लाख रुपये नुकतेच महावितरणकडे जमा करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित शाळांचा वीजपुरवठा तत्काळ जोडण्याचे निर्देश महावितरणकडून क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले होते. त्यानुसार वीजपुरवठा पूर्ववत करण्याची कार्यवाही करण्यात आली.
महावितरणच्या कल्याण परिमंडळांतर्गत कल्याण मंडळ एकमधील कल्याण, डोंबिवलीतील १३, कल्याण मंडळ दोनमधील उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड, शहापूर येथील ७३, वसई मंडळातील वसई, विरार, नालासोपारा व वाडा येथील ७४ तर पालघर मंडळातील बोईसर, डहाणू, पालघर, सफाळा, विक्रमगड, तलासरी, जव्हार, मोखाडा येथील सर्वाधिक १८४ शाळांचा वीजपुरवठा वीजबिल थकबाकीमुळे तात्पुरत्या स्वरूपात खंडित करण्यात आला होता. वीजबिलांची रक्कम जमा झाल्याने वरिष्ठ पातळीवरून मिळालेल्या आदेशानुसार या सर्व शाळांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..