
‘त्या’ आजीच्या भेटीला आव्हाडही जाणार
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : तिचे वय बघितले तर ती त्या गर्दीत काय करत होती, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येईल; पण यालाच म्हणतात निष्ठा, शिवसेनेची सर्वात मोठी ताकद, असे कौतुकाचे ट्विट गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. तसेच मातोश्रीबाहेर पक्षप्रमुखांना साथ देण्यासाठी आलेल्या त्या ९२ वर्षांच्या आजींच्या घरी भेट घेऊन त्यांच्या पाया पडणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान दिल्यानंतर शाखा क्रमांक २०२ च्या शिवसैनिक चंद्रभागा शिंदे या ९२ वर्षांच्या आजी ‘मातोश्री’ बाहेर ठाण मांडून बसल्या होत्या. ‘झुकेंगे नही’ असे खास शैलीत बोलत त्यांनी राणा दाम्पत्यांना सज्जड इशाराही दिला. वृत्तवाहिन्यांवर या आजी झळकल्या आणि त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मनही जिंकले. सध्या या चंद्रभागा आजींचीच चर्चा सर्वत्र आहे. खुद्द गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनीही या आजींचे कौतुक केले आहे.
आव्हाडांचे ट्विट
येणाऱ्या प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी गेले २-३ दिवस मातोश्रीच्या बाहेर तुफान गर्दी होती. त्या गर्दीत एक म्हातारी आजी देखील उभी होती. तिचे वय बघितले तर ती त्या गर्दीत काय करत होती, हा प्रश्न प्रत्येकाच्याच मनात येईल; पण यालाच म्हणतात निष्ठा! शिवसेनेची ही सर्वात मोठी ताकद आहे. आजकालच्या जगात तळहातावरच्या फोडासारखे जपलेली लोकं ही कधी पाठीत खंजीर खुपसतील हे सांगता येत नाही. मी त्या आजींच्या घरी जाऊन भेट घेणार व त्यांच्या पायाही पडणार!
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..