
अज्ञाताचा दूरध्वनी येताच एफआयआरमध्ये फेरबदल!
मुंबई, ता. २४ ः भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर शुक्रवारी कलानगर येथील सिग्नलवर झालेल्या हल्ल्यानंतर भाजप नेत्यांनी मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार दाखल केली होती. त्यानंतर रविवारी सांताक्रूझ पोलिस ठाण्यात तक्रारीवरील कारवाईची विचारणा करण्यासाठी आलेल्या कंबोज यांनी एफआयआरमध्ये फेरबदल केल्याचा आरोप केला आहे. एफआयआरमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर ३०७ माॅब लिंचिंगसह अनेक कलमे दाखल करण्यात आली होती. मात्र, वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना अज्ञात व्यक्तीचा दूरध्वनी येताच एफआयआरमध्ये फेरबदल केल्याचा आरोप कंबोज यांनी केला आहे. एफआयआरची मूळ काॅपी मिळेपर्यंत धरणे देण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
राणा दाम्पत्यांकडून ‘मातोश्री’वर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचे आव्हान केल्यानंतर तिथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. शुक्रवारी कलानगर सिग्नलवर आपली गाडी आली असता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप कंबोज यांनी केला आहे. सांताक्रूझ पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमध्ये शिवसेनेच्या नेत्यांचेही नाव असून, सुमारे ५०० कार्यकर्ते त्यात सामील असल्याचा आरोप कंबोज यांनी केला. मात्र, कंबोज ‘मातोश्री’ची रेकी करण्यासाठी तिथे आल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..