
प्लास्टिक, थर्माकॉलचे प्रदुषणाला निमंत्रण
वसई, ता. २४ (बातमीदार) ः प्लास्टिक व थर्माकॉलच्या वापरावर बंदी आहे. पण, वसई विरार शहरात मात्र याचा सर्रासपणे वापर केला जात असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे पर्यावरणाबाबत पालिका प्रशासनाची भूमिका उदासीन असल्याचे दिसत आहे.
प्लास्टिक व थर्माकॉलवर बंदी घातल्यानंतर सुरुवातीला महापालिकेने धडक मोहीम हाती घेतली होती. माल जप्त करून दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली. त्यामुळे नागरिकांत जागरुकता निर्माण झाली होती. नागरीक कागदी पिशवीचा वापर करायला लागले होते. पण, नंतर कारवाईचा वेग कमी झाला. चोरी छुपे पिशव्या वसई विरार शहरात येऊ लागल्या. त्यामुळे शहरातील कचराकुंड्या, सार्वजनिक ठिकाणे व मोकळ्या जागेत प्लास्टिक, थर्माकॉलचे खच पडलेले दिसत आहेत.
एकीकडे वसई विरार महापालिका प्रदुषणावर विविध उपायोजना कागदावर आखत आहे. पण, बंदी घातलेले प्लास्टिक मात्र सर्रास बाजारात दिसून येत आहे. त्यामुळे प्रदुषण रोखण्यास पालिका अयशस्वी ठरत आहे. महापालिकेच्या उदासीन भूमिकेमुळे पर्यावरणप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
----------
प्लास्टिक वापर नागरिकांनी टाळला पाहिजे. कागदी, कापडी पिशव्यांचा वापर व्हावा. पर्यावरण रक्षणासाठी हे पाऊल महत्वाचे आहे. या जागरूकतेची सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे. जेणेकरून प्रदुषणावर मात करणे सहज शक्य होईल.
अमृता पुरंदरे - अध्यक्षा, आरंभ सामाजिक प्रतिष्ठान
-----------
बाजारमंडई व दुकानात जाताना कापडी पिशव्या न्याव्यात. प्लास्टिक पिशवीत सामान दिले जात असेल तर मनाई करावी. त्यामुळे वापर होणार नाही व पर्यावरण व प्रदुषण रोखण्यास हातभार लागेल. पालिकेने कारवाई करणे गरजेचे आहे.
रवींद्र पाटील - पर्यावरण प्रेमी
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..