
अंबरनाथमध्ये भर दिवसा गोळीबार
अंबरनाथ, ता.२४ (बातमीदार) :अंबरनाथमध्ये एका बांधकाम व्यावसायिकावर भरदिवसा अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना घडली. या गोळीबारात बांधकाम व्यावसायिक थोडक्यात बचावला असून याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अंबरनाथ पश्चिमेच्या कोहोजगाव परिसरात मुकुल पाल्म सोसायटीत सफायर नावाच्या इमारतीत तळमजल्यावर बांधकाम व्यावसायिक कमरुद्दीन खान यांचे कार्यालय आहे. आज रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास कमरुद्दीन सोसायटीच्या कार्यालयात बसलेले असताना ऑफिसच्या खिडकीतून एका अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. मात्र या गोळ्या कमरुद्दीन यांना न लागता भिंतीवर लागल्या. गोळीबाराची ही घटना ऑफिसच्या सीसी टीव्ही कॅमेरात कैद झाली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. परिसरातल्या एका जागेवरून कमरुद्दीन खान यांचे गेल्या काही वर्षांपासून एका व्यावसायिकासोबत वाद होते याच वादातून हल्ला झाला असावा, असा संशय असून त्यादृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त जगदीश सातव यांनी दिली.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..