अनधिकृत ढाबे बंद करा!

अनधिकृत ढाबे बंद करा!

Published on

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २५ ः खवय्यांना ढाबा स्टाईल जेवण आकर्षित करत असल्याने कल्याण डोंबिवलीसह इतर परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत ढाबे उभे राहिले आहेत. या ढाब्यांमुळे हॉटेल व्यावसायिकांवर परिणाम होत असून अनधिकृत ढाब्यांवर कारवाई करून ते बंद करण्याची मागणी हॉटेल व्यावसायिक संघटनेने केली आहे. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर आणि भिवंडीतील हॉटेल व्यावसायिकांची सोमवारी कल्याणमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत सर्व व्यावसायिकांनी एकमताने ही मागणी केली.

कोरोनाकाळात हॉटेल व्यवसाय बंद असल्याने हॉटेल व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. आता हॉटेल व्यवसाय पूर्वपदावर येत आहे; परंतु शहरातील अनधिकृत ढाबे हे हॉटेल व्यावसायिकांसमोर मोठे आव्हान ठरत आहे. कोरोनाकाळात कोणतेही उत्पन्न नसताना वीजबिल, कामगारांचा पगार, सरकारचे विविध कर आणि परवाना नूतनीकरण शुल्क हॉटेल व्यावसायिकांना भरावेच लागले आहे. आता कोरोना निर्बंध पूर्णपणे उठवल्याने हॉटेल व्यावसायिकांचे व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. मात्र गेल्या काही वर्षात कल्याण डोंबिवलीसह आजूबाजूच्या परिसरातील मुख्य रस्त्यांच्या बाजूला अनधिकृत ढाबे सुरू झाले आहेत. ढाबा स्टाईल ग्राहकांना आकर्षित करते, त्यामुळे अनेकदा अन्नाच्या चवीकडे, स्वच्छतेकडे दुर्लक्ष करून ग्राहक तेथे जाऊन जेवणाचा आस्वाद घेतात. ही ढाबा संस्कृती हॉटेल व्यावसायिकांसमोर मोठे आव्हान ठरत आहे.

अनधिकृत ढाब्यांना कोणाचे संरक्षण?
हॉटेल व्यावसायिक सरकारचा रीतसर सर्व कर, देयके भरत आहेत. याउलट सरकारची कोणतीही परवानगी न घेता, शुल्क न भरता अनधिकृत ढाबे सर्रासपणे सुरू असून त्यांना कोणाचे संरक्षण आहे, असा संतप्त सवाल हॉटेल व्यावसायिकांनी उपस्थित केला. या अनधिकृत ढाब्यांमुळे आमचे मोठे आर्थिक नुकसान होत असून सरकारने तातडीने त्यांच्यावर कारवाई करण्याची आग्रही मागणी हॉटेल व्यावसायिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com