पालीमध्ये ईश्‍वरनिष्‍ठांची मांदियाळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालीमध्ये ईश्‍वरनिष्‍ठांची मांदियाळी
पालीमध्ये ईश्‍वरनिष्‍ठांची मांदियाळी

पालीमध्ये ईश्‍वरनिष्‍ठांची मांदियाळी

sakal_logo
By

पाली, ता. १ (वार्ताहर) ः नववर्षाच्या पहिल्‍याच दिवशी अष्टविनायकांपैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीतील बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. पहाटेपासूनच रांगा लागल्‍या होत्‍या. गेल्‍या दोन दिवसांपासून हजारो भाविक दाखल झाल्‍याने मंदिर परिसरातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचा धंदा तेजीत आहे. कोरोनामुळे दोन वर्षे मंदी होती, मात्र आता गर्दी होत असल्याने व्यावसायिक सुखावले आहेत. पालीत हजारोंच्या संख्येत भाविक व त्यांची वाहने आल्‍याने वाहतूक कोंडीची समस्‍या जटील झाली आहे.
नाताळपासून सुरू झालेली भाविकांची गर्दी थेट नववर्षातही कायम राहिली. यापुढेही शाळा-महाविद्यालयीन सहली आणि २५ जानेवारीला असलेल्‍या माघी गणेशोत्सवामुळे महिनाभर पालीत भाविकांची मांदियाळी पाहायला मिळेल, असे बल्लाळेश्वर देवस्थानचे उपाध्यक्ष वैभव आपटे यांनी सांगितले.
भाविकांची गर्दी असल्याने दुकाने, हॉटेल व लॉज गजबजले आहेत. खेळणी, शोभिवंत वस्तूंची दुकाने, नारळ, हार, फुले व पापड, मिरगुंड, कडधान्य विक्रेते, प्रसाद व पेढेवाल्‍यांची रविवारी लगबग सुरू होती. भाविकांच्या सोईसाठी देवस्थान ट्रस्टच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती.

वाहतूक कोंडी
खासगी वाहने, डम्पर, अवजड व लक्झरी वाहनांची ये-जा, नियमांचे उल्लंघन करणारे चालक, अरुंद रस्ते, रस्त्याच्या दुतर्फा उभी वाहने व बांधकामांमुळे पालीत नेहमीच वाहतूक कोंडी होते. सुट्यांच्या काळात तर मोठ्या प्रमाणात पर्यटक व भाविक पालीमध्ये दाखल होतात. या वाहनांमुळे पालीतील वाहतुकीवर प्रचंड ताण येऊन कोंडीची समस्‍या आणखी जटील होते.


वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नाक्यावर पोलिस तैनात असतात, मात्र अरुंद रस्ते, अवजड वाहतूक, एकेरी वाहतुकीवरून दुहेरी वाहतूक आणि वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम न पाळल्याने व रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केल्‍याने कोंडीवर नियंत्रण मिळवताना अडचणी येतात. बल्लाळेश्वर देवस्थानचे सुरक्षा रक्षक तैनात असले तरी वाहनांच्या संख्येत मनुष्‍यबळ अपुरे असल्‍याने कोंडीवर नियंत्रण मिळवताना त्‍यांची दमछाक होते.

देवस्थान ट्रस्टने भाविकांसाठी विशेष सोयीसुविधा उपलब्ध केल्या आहेत. भाविकांच्या सुरक्षेसाठी मेटल डिटेक्टर लावले आहेत. रांगेत उभे राहण्यासाठी रेलिंग, मांडव व शेड उभारले आहे. स्वच्छतागृह उभारले आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये, म्‍हणून प्रयत्‍नशील आहोत.
- जितेंद्र गद्रे, अध्यक्ष, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट, पाली

शाळा-महाविद्यालयांना सुटी असल्याने तसेच नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्यासाठी हजारो भाविक रविवारी बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी आले आहेत. भाविकांची गर्दी वाढल्‍याने व्यवसायही तेजीत आहे. दोन वर्षे कोरोनामुळे ठप्प झालेल्या व्यवसायाला आता गती मिळत आहे.
- राहुल मराठे, व्यावसायिक, बल्लाळेश्वर देवस्थान

पाली ः बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी रांगा लागल्‍या होत्‍या.
पाली ः बल्लाळेश्वर मंदिर परिसरातील दुकाने सजली आहेत.