हजारो पर्यटकांचा खोळंबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हजारो पर्यटकांचा खोळंबा
हजारो पर्यटकांचा खोळंबा

हजारो पर्यटकांचा खोळंबा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १ : नववर्षाच्या स्वागतासाठी अलिबागमध्ये आलेल्या हजारो पर्यटकांचा परतीचा प्रवास खोळंबला आहे. रविवारी (ता. १) प्रवाशांची संख्या वाढेल, हे लक्षात घेत बंदर विभागाने बोटींची संख्या दुप्पट केली होती. तरीही दुपारनंतर अचानक गर्दी वाढल्याने बंदरावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सायंकाळी ६ वाजल्यानंतरही दीड ते दोन हजार पर्यटक रांगेत उभे होते.

सरत्या वर्षाला रात्री उशिरापर्यंत निरोप देत मध्यरात्री नववर्षाचे जल्लोषात स्वागत करत आज सकाळी आरामात प्रवास करण्याचा बेत अनेक पर्यटकांच्या अंगलट आला. दुपारी दोन वाजता रांगेत उभे राहणाऱ्यांना सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत लॉन्चमध्ये बसण्यास जागा मिळाली नव्हती. सायंकाळी ६ वाजल्यानंतरही मोठ्या प्रमाणात प्रवासी बंदरात आपला क्रमांक लागेल याची वाट पाहत उभे होते. या प्रवाशांनी दुपारी ३ वाजण्यापूर्वीच तिकीट काढले होते. त्यानंतरही प्रवासी येत असल्याने बंदर विभागाने तिकीट देणे बंद केले. अनेक तास वाट पाहूनही क्रमांक लागत नसल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. प्रवाशांची संख्या वाढत गेल्याने अखेर मांडवा सागरी पोलिसांचा बंदोबस्त मागवण्यात आला.

प्रवाशांसाठी वाढीव फेऱ्या
मांडवा बंदर विभागाच्या माहितीनुसार परतीच्या प्रवासासाठी अजंठा लॉन्च सर्व्हिसेसच्या ४५ फेऱ्या वाढवण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे पीएनपी, मालदार, अपोलो लॉन्च सर्व्हिसेसनेही फेऱ्या वाढवल्या आहेत. सकाळपासून सरासरी २०० प्रवासी क्षमतेच्या ७० फेऱ्या मांडवा बंदरातून सोडण्यात आल्या, तरीही मांडवा बंदरातील प्रवाशांची संख्या कमी होण्याची लक्षणे दिसत नाहीत.

आम्ही दुपारी तिकीट काढले होते, परंतु सायंकाळी ६ वाजेपर्यंतही आम्हाला बोटीत प्रवेश मिळालेला नाही. आमच्या पुढे आणखी पाचशे प्रवासी आहेत. एका बोटीची क्षमता दीडशेपर्यंत असतानाही क्षमतेपेक्षाही जादा तिकिटे विकण्यात आली. मेरी टाईम महामंडळ नियमांचे हे उल्लंघन असून कंत्राटदारांची चौकशी होणे आवश्यक आहे. अनेक प्रवासी तीन तासांहून अधिक वेळ रांगेत उभे आहेत. कोणत्याही सुविधा नसल्यामुळे महिला प्रवाशांची कुचंबणा होत आहे.
- प्रमोद नागोठणेकर, प्रवासी

रो-रोच्या ८०० प्रवासी क्षमतेच्या चार फेऱ्या झालेल्या आहेत. याबरोबरच प्रवासी बोटींनी सायंकाळी ६ वाजेपर्यंत पंधरा हजार प्रवाशांना आम्ही मुंबईत पोहचवले आहे. त्यानंतरही बंदरातील प्रवाशांची संख्या कमी झालेली नाही. त्यांना सोडण्यासाठी रात्री ९ वाजण्यापेक्षाही जास्त वेळ लागू शकतो. दररोजच्या संख्येपेक्षा बोटींची संख्या वाढवण्यात आली आहे. बंदरात बोटी लावण्यासही जागा अपुरी पडत आहे.
- ए. एन. मानकर, बंदर निरीक्षक, मांडवा