एमबीबीएस प्रवेशासाठी ६० लाखांची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एमबीबीएस प्रवेशासाठी ६० लाखांची फसवणूक
एमबीबीएस प्रवेशासाठी ६० लाखांची फसवणूक

एमबीबीएस प्रवेशासाठी ६० लाखांची फसवणूक

sakal_logo
By

अलिबाग, ता. ५ (बातमीदार) : अलिबाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘एमबीबीएस’साठी प्रवेश देण्याचे प्रलोभन दाखवून विद्यार्थ्यांची ६० लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पैसे भरूनही प्रवेश न मिळाल्याने अलिबाग पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करून याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती अलिबाग पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकारामुळे खडबडून जागे झालेल्या रुग्ण प्रशासनाने प्रवेश घेणाऱ्यांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये, असे आवाहन पत्रद्वारे केले आहे.

अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीमध्ये शासकीय वैद्यकीय विद्यालयाचे कार्यालय आहे. येथे ‘ऑल इंडिया कोटा अॅण्ड स्टेट कोटा सेट सेल’कडून नामनिर्देशित विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. ‘एमबीबीएस’ची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन आतापर्यंत २०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे; मात्र काही मंडळींकडून प्रवेश देण्यासाठी पैशांचे प्रलोभन दाखवल्याने अनेक विद्यार्थी त्याला बळी पडले. ही बाब लक्षात येताच महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी सतर्कतेचे आवाहन केले आहे. विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी सतर्क राहून एखादी व्यक्ती संशयित आढळून आल्यास त्याबाबत तात्काळ अधिष्ठाता कार्यालय, पोलिस प्रशासनाला कळविण्याचे आदेश दिले आहेत.

एमबीबीएस प्रवेश देण्यासाठी विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा रुग्णालयामार्फत परिचारिका प्रवेश प्रक्रियाही सुरू आहे. प्रवेश देण्यासाठी काहीजण आर्थिक फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रलोभनाला कोणीही बळी पडू नये.
- डॉ. सुहास माने, शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय