
मुरूडमधील उद्यानांना नवसंजीवनी
मुरूड, ता. ५ (बातमीदार) : मुरूड-जंजिरा हे पर्यटन स्थळ म्हणून परिचित आहे. या स्थळाची उद्यानांचे शहर म्हणून नव्याने ओळख निर्माण होत आहे. येथील उद्यानांच्या सौंदर्यीकरणासाठी अलिबाग-मुरूडचे आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रयत्नाने ४ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर झाला. उद्यानांमुळे शहराच्या सौंदर्यात आणखी भर पडणार असून, येथील पर्यटन व्यवसायालाही बळकटी मिळेल, अशी अपेक्षा येथील पर्यटक व्यावसायिक व्यक्त करत आहेत.
जंजिरा नगर परिषदेला आमदार महेंद्र दळवी यांच्या माध्यमातून सरकारकडून सुरुच्या बनाच्या सुशोभीकरणासाठी ३ कोटी ५० लाख, तर उर्वरित उद्यानांच्या सौंदर्यीकरणासाठी १ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. समुद्रकिनारी असलेली विश्राम बाग, एसटी डेपोसमोरील श्रीदत्त गुरू उद्यान, अलका पुरी उद्यान याचे उद्घाटनही झाले आहेत. तसेच कुंभार वाड्यातील संत गोरोबा कुंभार उद्यान, नगर परिषद कार्यालयासमोरील सिद्धी बाग व जंजिरकर गल्लीतील भोगेश्वर उद्यानाची कामे प्रगतिपथावर आहेत. अलिकडेच नूतनीकरण करण्यात आलेल्या विश्रामबाग येथील बाल गोपाळांसाठी मोठे आकर्षण ठरू पाहत आहे. या बागेतूनच सूर्यास्ताचा अनोखा देखावा न्याहळता येत असल्याने पर्यटकांचीही वर्दळ येथे वाढत आहे. तसेच शहरातील भोगेश्वर मंदीर उद्यान, सिद्धी बाग उद्यान, संत गोरोबा कुंभार उद्यान, अलका पुरी उद्यान, श्री दत्त गुरु उद्यान अशी उद्याने असून त्यांची दुरुस्ती नगरपालिका प्रशासनाने हाती घेतली आहे. या उद्यानांमुळे मुरूडचे सौंदर्य बहरू लागले आहे. विस्तीर्ण समुद्रकिनारा, ऐतिहासिक जंजिरा व पद्मदुर्ग किल्ला पाहण्यासाठी प्रतिवर्षी लाखो पर्यटक दाखल होत असतात. याबरोबरच आता उद्यानांकडे पर्यटक आकर्षित होतील, अशी आशा येथील व्यावसायिकांना आहे.
***
समुद्र किनाऱ्यावरील सुरुच्या उद्यानाचे काम प्रस्तावित आहे. मात्र, या कामासाठी सीआरझेडची परवानगी आवश्यक असून ती परवानगी आल्यानंतर कामाला सुरुवात होईल. याच दरम्यान इतर उद्यानांची कामे सुरू होत आहेत.
- पंकज भुसे, मुख्याधिकारी, मुरूड-जंजिरा नगरपरिषद
फोटो मेघराज जाधव यांनी पाठवलेला आहे.