कुपोषित बालकाच्या प्रकृतीत सुधारणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुपोषित बालकाच्या प्रकृतीत सुधारणा
कुपोषित बालकाच्या प्रकृतीत सुधारणा

कुपोषित बालकाच्या प्रकृतीत सुधारणा

sakal_logo
By

नेरळ, ता. ७ : आईच्या मृत्यूनंतर कुपोषणामुळे मृत्यूच्या दारात पोचलेल्या कर्जत तालुक्यातील डामसेवाडी येथील एका पाच महिन्याच्या बालकाला एकात्मिक बाल विकास प्रकल्पाचे कर्मचारी व युनाइटेड वे या संस्थेचे कार्यकर्त्यांमुळे जगण्याची नवी संधी मिळाली आहे. कर्जत उपजिल्हा रुग्णालयात एनआरसी विभागात दाखल केल्‍यावर तत्काळ उपचार सुरू केल्याने बाळाची प्रकृतीत आता सुधारणा पाहायला मिळत आहे.
पाच महिन्यांच्या बाळाचे वजन १ किलो ८०० ग्राम आहे. युनाइटेड वे संस्‍थेचे कार्यकर्ते, एकात्मिक बालविकास विभागाच्या पर्यवेक्षिका शरयू तांबे, अंगणवाडी सेविका तारा अनंत मेंगाळ या बाळासाठी देवदूत ठरल्या आहेत. कर्जत तालुका हा आदिवासी बहुल आहे. आदिवासी कुटुंबांमध्ये जन्मणाऱ्या बालकांमध्ये कुपोषणाची समस्या सातत्याने डोके वर काढत असते.
कुपोषण मुक्तीसाठी सामाजिक संस्था सातत्याने प्रयत्न करीत असतात. काही दिवसांपूर्वी या भागाची पाहणी करताना खांडस जवळ डामसेवाडी गावात जगदीश अवटे यांचा मुलगा कुपोषित असल्याचे आढळले. बालकाची आईचे नुकतेच निधन झाल्यामुळे दिवसेंदिवस त्याची प्रकृती खालावली होती. आईचे छत्र हरपल्यानंतर बाळ कुपोषणाच्या विळख्यात सापडले. युनाइटेड वे संस्‍थेचे कार्यकर्ते डामसेवाडीत सर्वेक्षणासाठी फिरत असताना त्यांना अवटे यांचे बाळ तीव्र कुपोषित असल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ अवटे कुटुंबाशी बोलून बाळाला कर्जत उपजिल्हा रुग्णालयात एनआरसी विभागात दाखल केले. डॉक्टरांनी लागलीच उपचार सुरू केल्‍याने बाळाची प्रकृती सुधारत आहे.

बाळाचे वजन खूपच कमी आहे. उपचार आणि योग्य आहारामुळे त्याची प्रकृती सुधारत आहे. बाळाची नियमित काळजी घेतली जात असून ते निरीक्षणाखाली आहे.
- डॉ. मनोज बनसोडे, वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालयातील, कर्जत

कुपोषण मुक्ती हाच आमचा उद्देश असून एक जीव आम्ही वाचवल्याचा आनंद आहे. कर्जतसह कशेळे येथील उपजिल्हा रुग्णालयातही एनआरसी केंद्र असावे, ज्यामुळे कुपोषित बालकांवर वेळेत उपचार होतील.
- अनिल परमार, स्वयंसेवक, युनाइटेड वे