
वर्षभर १७ लाख नागरिकांना मोफत धान्य
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ९ : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून पात्र रेशन कार्डधारकांना आता वर्षभर मोफत अन्नधान्य उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे गोरगरीब जनतेला सध्याच्या महागाईत दिलासा मिळणार आहे. रायगड जिल्ह्यातील १७ लाख नागरिकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. गोरगरीब जनतेला स्वस्त दरात धान्य उपलब्ध व्हावे, यासाठी राज्य सरकारतर्फे काही वर्षांपासून रेशनचे धान्य वितरित करण्यात येते.
केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना सुरू केली. योजनेच्या माध्यमातून माणसी प्रतिकिलो ३ रुपये दराने तांदूळ, २ रुपये दराने गहू व १ रुपये दराने भरडधान्य उपलब्ध करून दिले जाते. त्यानुसार राज्यभरातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा स्वस्तधान्य वाटप केले जात आहे.
जिल्ह्यातील जवळपास ४ लाख ५० हजार ७३६ कुटुंबामधील १७ लाख ६४ हजार १४५ गोरगरीब जनतेला दरमहा धान्य वितरित केले जात आहे. कोरोनाच्या कालावधीत गोरगरीब जनतेला केंद्र सरकारतर्फे दरमहा मोफत अन्नधान्य दिले जात होते. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दरमहा दोनदा धान्य उपलब्ध होत होते.
धान्य वितरणाचे पुरवठा विभागाला आदेश
केंद्र सरकारने १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत रेशन कार्डधारकांना दरमहा मोफत धान्य वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महागाईच्या काळात जनतेला दिलासा मिळणार आहे. मोफत धान्य वितरित करण्याबाबत जिल्हा पुरवठा विभागाला आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार या विभागामार्फत नियोजन सुरू आहे.