जिल्ह्यात झेन गार्डनची क्रेझ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात झेन गार्डनची क्रेझ
जिल्ह्यात झेन गार्डनची क्रेझ

जिल्ह्यात झेन गार्डनची क्रेझ

sakal_logo
By

अमित गवळे, पाली
मुंबई, पुणे, ठाणे शहराला लागून असलेल्या रायगड जिल्ह्यातील निसर्गरम्य वातावरणात राहणे अनेक जण पसंत करतात. यामुळे जिल्ह्यात बहुसंख्येने फार्महाऊस उभे राहिले आहेत. शिवाय पर्यटनामुळे हॉटेल व्यवसायही तेजीत असून फार्महाऊस व हॉटेलच्या सभोवताली गार्डन महत्त्व आहे. सध्या झेन गार्डनला विशेष पसंती दिली जात आहे. ही बाग अतिशय आकर्षक व लक्षवेधी आहे. शिवाय निर्मिती व देखभालीसाठी कमी खर्च येत असून साहित्यही सहज उपलब्ध होते.
पाली-खोपोली राज्य महामार्गावर नुकतेच परळी येथील एका हॉटेलजवळ झेन गार्डनची निर्मिती करण्यात आली. हॉटेलच्या मालकांना प्रवेशद्वारावरच आकर्षक गार्डन हवे होते. मात्र छप्पर असल्याने तिथे झाडे वाढत नव्हती. कमी जागेत छान उद्यान साकारण्याचा त्‍यांचा संकल्‍प होता. गार्डन बनविण्यात हातखंडा असलेल्‍या अमित निंबाळकर यांनी ८० टक्‍के रंगीत खडी, रंग व झाडे वापरून आकर्षक उद्यान करून दिले. यासाठी देठ व पाने जाड रसदार असलेली झाडे (Succulent) वापरण्यात आली.

छोट्या जागेची शोभा वाढविते
झेन गार्डन मोठ्या तसेच छोट्या जागेत बनविता येते. एखाद्या घराच्या, फार्महाऊसच्या किंवा हॉटेलच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा सभोवतालच्या परिसरात ते बनविले जाते. यातील विशिष्ट झाडे, फुलझाडे, गवत, रंगीत दगड व विटा आणि वेगवेगळे नक्षीकाम शोभा वाढविते.

देखभाल खर्च कमी
बाग बनविण्यासाठी लागणारे साहित्य फार महाग नसते. झाडे, गवत सहज उपलब्ध होते. शिवाय देखभालीचा खर्चही कमी असतो. मात्र उद्यान बनवणारे तज्ज्ञ लागतात. शिवाय सजावटीत कल्पकता आवश्यक आहे. साधारण ८० ते १०० रुपये चौरस फूट इतका खर्च येतो.

मुख्य रस्त्याला हॉटेल असल्यामुळे येणारे ग्राहक मुंबई, पुण्याचे अथवा स्‍थानिक असतात. हॉटेलमध्ये प्रवेश करताना त्यांचे स्वागत म्हणून काहीतरी छान असावे, अशी अपेक्षा होती. लॉन आणि झाडांमुळे कचरा होतो, शिवाय आकर्षकही वाटत नव्हते. शिवाय त्यांचा मेंटेनन्ससुद्धा अधिक होता. आता झेन गार्डन बनवल्‍याने ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे. एक प्रकारे सेल्‍फिपॉईंट झाला आहे.
- नरेंद्र पंडित, हॉटेल मालक

हॉटेल किंवा फार्महाऊसकडे आल्यावर काहीतरी चांगले आणि नवीन बघायला मिळेल, अशी लोकांची अपेक्षा असते. झेन गार्डनमध्ये वेगवेगळे रंगीत डिझाईन देता येतात. या उद्यानात झाडे, रोपे असतात, शिवाय मेंटेनन्सवर येणारा खर्च व वेळ वाचतो. त्यामुळे अनेकजण मागणी करत आहेत.
- अमित निंबाळकर, गार्डन व लँडस्केप तज्‍ज्ञ, सुधागड