पालीत बॅनरबाजीला ऊत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालीत बॅनरबाजीला ऊत
पालीत बॅनरबाजीला ऊत

पालीत बॅनरबाजीला ऊत

sakal_logo
By

पाली, ता. २३ (वार्ताहर) : कोरोनानंतर दोन वर्षांनी मोठ्या उत्साहात माघी गणेशोत्सव साजरा होत आहे. हजारोंच्या संख्येने भाविक पालीत दाखल होत आहेत. श्री गणेश जयंतीला बुधवारी (ता.२५) लाखोंच्या संख्येने भाविक पालीत येतील. अशा वेळी माघी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा, दुकाने व इमारतींवर, जागा मिळेल तिथे सर्वत्र मोठाले बॅनर व बॅनरच्या कमानी लावण्यात आल्या आहेत. अशा बॅनरमुळे पाली शहराला बकाल स्वरूप आल्याने स्थानिकांसह भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, व्यावसायिक, लोकप्रतिनिधी, स्वयंघोषित नेते यांचे माघी गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छांचे बॅनर व बॅनरच्या कमानी सर्वत्र झळकत आहेत. पालीमध्ये आधीच अरुंद रस्ता आहे. त्यात रस्त्यांच्या दुतर्फा बॅनर लावल्यामुळे रस्ता आणखी अरुंद वाटत आहे. यात वाहतुकीला मात्र अडथळा येत आहे. गणेश जयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा बॅनर्स लावल्यामुळे शहराला बकाल स्वरूप आले आहे. त्‍यावर स्थानिक नाराजी व्यक्त करत आहे. यातील अनेक जाहिराती या विनापरवानगी लावल्या असून त्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे.

धार्मिक उत्सवात अशा बॅनरबाजीमुळे पालीला बकाल स्वरूप आले आहे. यामुळे पालीची प्रतिमा मलिन होत आहे. बॅनरबाजीवर पैसे घालवण्यापेक्षा भाविकांना सोयी-सुविधा देण्यासाठी काही कामे व उपक्रम करणे गरजेचे होते.
- सुशील शिंदे, तरुण, पाली

पाली नगरात लागलेले सर्व बॅनर हे कोणत्या कारणासाठी लावले आहेत तेच कळत नाही. या बॅनरवरील कोणत्याच माणसाला मुंबई-पुणेवरून येणारे भाविक ओळखण्याची सुतराम शक्यता नाही. त्यापेक्षा येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी नगरसेवकांनी अथवा राजकीय पक्षांनी तो पैसा वापरण्याची गरज आहे.
- अनुपम कुलकर्णी, नागरिक, पाली

हे बॅनर लावण्यासाठी कोणीही नगरपंचायतींकडून कोणत्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही. यासाठी कोणताही निधी आमच्याकडे आलेला नाही. याबाबत आम्ही लवकरच कारवाई करणार आहोत.
- विद्या येरूणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, पाली