
आणखी चार ग्रामपंचायतींना आयएसओ मानांकन
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ४ : तालुक्यातील कामार्ली ग्रामपंचायतीसह उरणमधील पुनाडे व दिघोडे; तसेच पेण तालुक्यातील उंबर्डे या चार ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. ३) आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. विशेष म्हणजे जानेवारी महिन्यात जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींनी आयएसओ मानांकन प्राप्त केले होते. तसेच जिल्ह्यातील आणखी ४३ ग्रामपंचायतींची आयएसओ मानांकन प्रमाणपत्र मिळविण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे.
शासन व्यवहारात पारदर्शकता आणि गतिमानता यावी, यासाठी ई-गव्हर्नन्सचा वापर केला जात आहे. ग्रामपंचायतीमधील विविध रजिस्टर्स, फॉर्मस, दस्ताऐवजांचे संगणकीकरण करून पेपरलेस ग्रामपंचायतींकडे वाटचाल सुरू आहे. बदलत्या परिस्थितीत ग्रामपंचायतींची कार्यपद्धतीचे पुर्विलोकन करून व्यवसाय प्रक्रिया पुनर्निर्मिती करण्याची गरज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रशासकीय कामकाज कार्यक्षम व्हावे आणि कार्यपद्धतीत गुणात्मक सुधारणा करण्यासाठी आयएसओ प्रमाणिकीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने २०१९ मध्ये घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना आयएसओ मानांकन मिळण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. जानेवारी महिन्यात बोरीस गुंजीस, सातीर्जे, सारळ ग्रामपंचायतींना आयएसओ मानांकन प्राप्त झाले होते. यानंतर शुक्रवारी अलिबाग तालुक्यातील कामार्ली, उरणमधील पुनाडे व दिघोडे; तसेच पेण तालुक्यातील उंबर्डे या चार ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.