अखेर घरकुलाची प्रतीक्षा संपली

अखेर घरकुलाची प्रतीक्षा संपली

Published on

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ९ : तालुक्यातील कुर्डुस परिसरातील तब्बल १०५ आदिवासी बांधवांची घरकुलाची प्रतीक्षा संपली आहे. शबरी आदिवासी योजनेतून २६९ चौरस फुट क्षेत्राची घरकुले अलिबाग पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शुभांगी नाखले यांनी मंजूर केली आहेत. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या मार्गदर्शनासाठी तालुका संघटक तुषार शेरमकर, कुर्डुस ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सूर्यकांत केणी यांनी विक्रमी स्वरूपात घरकुले मंजूर करून घेतली आहेत. काही दिवसांतच या घरकुलांचे काम सुरू होणार असल्याने आदिवासी वाड्यांवर आनंदोत्सव साजरा केला जात आहे.
शबरी आदिवासी घरकुल योजना ही आदिवासी उपयोजनेअंतर्गत अनुसूचित जमातीमधील लाभार्थींसाठी सुरू करण्यात आलेली आहे. पात्र असलेल्या नागरिकांसाठी २६९ चौरस फूट क्षेत्रफळाचे पक्के घरकुल सरकाकरडून बांधून दिले जाते. अलिबाा तालुक्यातील कुर्डुस परिसरातील अशा १०५ आदिवासी बांधवांनी उत्पन्नाचा दाखला, अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र यांसह आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली आहे. हे सर्व आदिवासी या योजनेसाठी पात्र असल्याचे प्रमाणपत्र अलिबाग पंचायत समितीने दिले आहे.
मोलमजुरी करणारे हे आदिवासी आतापर्यंत दगडमातीच्या तात्पुरत्या स्वरूपातील घरात राहत होते. सरकारकडून पक्की घरकुले बांधून मिळणार असल्याने या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. आज अलिबाग तहसील कार्यालयात येऊन या सर्वांनी सरकारला बंधपत्राद्वारे आपली कागदपत्रे सादर केली. अनेक वर्षांपासून कच्च्या घरात राहणाऱ्या या सर्वांची स्वप्नपूर्ती झाल्याने या सर्वांनी शिवसेनेचे तालुका संघटक तुषार शेरमकर, सूर्यकांत केणी यांचे आभार मानले. घरकुल योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींना घर बांधण्यासाठी १.२० लाख रुपये इतकी आर्थिक मदत करण्याची तरतूद आहे. तसेच मनरेगा माध्यमातून या लाभार्थींना रोजगारही उपलब्ध होणार आहे.


पिढ्यानपिढ्या हे आदिवासी बांधव दगडमातीच्या कच्च्या घरात राहत होते. आतापर्यंतच्या तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी मतांसाठी राजकारण करत या आदिवासी बांधवांना सुखसोयीपासून वंचित ठेवले. या बांधवाना अनेक आश्वासने दिली; परंतु ती पूर्ण झालेली नाहीत. आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रयत्नाने येथील नागरिकांना अनेक सुविधा दिल्या जात असून मंजूर झालेली घरकुलेही त्याचाच एक भाग आहे.
- तुषार शेरमकर, तालुका संघटक, बाळासाहेबांची शिवसेना

सहा ग्रामपंचायतींमधील लाभार्थी
कुर्डुस विभागातील सहा ग्रामपंचायतींमधील १०५ आदिवासी लाभार्थींना या योजनेचा लाभ मिळाला आहे. यामध्ये कुर्डुस ग्रामपंचायतीमधील ७०, बेलोशीमधील १५, बोरघरमधील आठ, खंडाळेमधील एक, ताडवागळेमधील सहा आणि रामराज येथील पाच जणांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.