निवडणुकीच्या धर्तीवर परीक्षा केंद्रावर नजर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवडणुकीच्या धर्तीवर परीक्षा केंद्रावर नजर
निवडणुकीच्या धर्तीवर परीक्षा केंद्रावर नजर

निवडणुकीच्या धर्तीवर परीक्षा केंद्रावर नजर

sakal_logo
By

अलिबाग, ता. १५ (बातमीदार)ः बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा दोन मार्चपासून सुरू होत आहेत. कॉपी मुक्त अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करून परीक्षेच्या कालावधीत जिल्ह्यातील १२० केंद्रावर होणारे गैर प्रकार टाळण्याचा प्रयत्न महसूल, पोलिस व जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत केला जाणार आहे. निवडणुकीच्या धर्तीवर परीक्षा केंद्रावर नजर राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी दिली. यावेळी पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे उपस्थित होते.
जिल्ह्यातील ४६ परीक्षा केंद्रावर बारावीची परीक्षा होणार आहेत. यासाठी ३१ हजार २७२ विद्यार्थी बसणार आहेत. तसेच दहावीची परीक्षा २ मार्च ते २५ मार्च या कालावधीत होणार आहे. ही परीक्षा ७४ केंद्रावर होणार असून ३५ हजार ७३३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यंदा कॉपी मुक्त महाराष्ट्र अभियानाच्या माध्यमातून परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या संशयित हालचालीवर लक्ष ठेवले जाणार आहे.
प्रत्येक तालुक्यात एक पथक नियुक्त केले आहे. जिल्हास्तरावर पाच भरारी पथक नियुक्‍त असतील. परीक्षेला येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांची झाडाझडती घेतली जाणार आहे. परीक्षा केंद्रापासून शंभर मीटर अंतरावर कोणालाही फिरकू दिले जाणार नाही. निवडणुकीच्या धर्तीवर परीक्षा केंद्रावर नजर राहणार आहे.
कॉपीमुक्त अभियानाबाबत जनजागृती करण्यासाठी संस्था चालक, शाळा, पालकांसमवेत दोन ते तीन दिवसांत शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत बैठक घेतली जाणार आहे. परीक्षा केंद्रावर तहसीलदार व उपजिल्हाधिकारी नोडल व झोनल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. त्यात उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी झोनल अधिकारी म्हणून असणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी दिली.

तोतया विद्यार्‍थ्‍यावर फौजदारी गुन्हा
परीक्षा केंद्रावर व्हिडीओ रेकॉर्डिंग असणार आहे. तोतया विद्यार्थी सापडल्यास त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे. दहावी व बारावीची परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी हा उद्देश समोर ठेवून पारदर्शक स्वरूपात परीक्षा पार पाडावी, यासाठी हे अभियान सुरू केले आहे.