रयतेच्‍या राजाला मानाजा मुजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रयतेच्‍या राजाला मानाजा मुजरा
रयतेच्‍या राजाला मानाजा मुजरा

रयतेच्‍या राजाला मानाजा मुजरा

sakal_logo
By

अलिबाग, ता. १९ (बातमीदार) ः तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागात छत्रपतींच्‍या जयघोष करण्यात आला. शिवजयंतीनिमित्त आयोजित सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमात आबालवृद्धांनी सहभाग घेत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. अनेकांनी पारंपरिक वेशभूषा करीत मराठी संस्कृतीचा वारसा जपण्याचा प्रयत्न केला. अनेक संस्था आणि मंडळांनी सामाजिक उपक्रमांसह लोकोपयोगी कार्यक्रम राबवले. प्रबोधनात्मक फलक, पोवाडा, लोकनृत्य, पथनाट्यातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्‍न यावेळी शिवप्रेमींनी केला.
अलिबागमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, अलिबाग नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. संपूर्ण शहरामध्ये अलिबाग नगरपरिषदेसह मावळा प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची व पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये तरुणांसह ज्येष्ठ मंडळी व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ढोल ताशांच्या गजरात तसेच शिव गर्जनाने परिसर दुमदुमून गेला होता. एक वेगळा उत्साह, व आनंद प्रत्येक शिव प्रेमींमध्ये दिसून आला. गावागावांत मिरवणुकांबरोबरच पोवाडे वाजत होते. तर शहरात दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तर काही ठिकाणी दांडपट्टा, लाठी-काठी असे अनेक पारंपरिक खेळांचे सादरीकरण करण्यात आले. मिरवणुकीत बालशिवाजी, जिजाऊ, मावळ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हातात भगवा घेऊन छत्रपती शिवाजी महाराज अशा घोषणा देत शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना दिली. ढोल ताशांच्या गजरात व शिव गर्जनांनी संपूर्ण नगरी दुमदुमली होती.