
शिक्षकेत्तर कर्मचारी बेमुदत संपावर
अलिबाग, ता. २० (बातमीदार) ः प्रलंबित मागण्यासाठी अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून बेमुदत संप पुकारले असून जिल्ह्यातील सुमारे १४ महाविद्यालयातील शंभरहून अधिक कर्मचारी सहभाग झाले आहेत. बारावीच्या परीक्षा मंगळवारपासून सुरू होणार असून कर्मचाऱ्यांच्या संपामुळे परीक्षेवर तसेच दैनंदिन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सोयी सुविधा पुरवण्यापासून प्रशासकीय कामकाज चोखपणे बजावण्याचे काम शिपायापासून कार्यालयीन अधीक्षक करतात. मात्र या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारकडून दुर्लक्ष होत आहे. चार वर्षांपासून न्यायासाठी शासन दरबारी फेऱ्या मारून सकारात्मक भूमिका घेतली जात नसल्याने सोमवारपासून संप पुकारला आहे. सुधारित सेवांअतर्गंत आश्वासित प्रगती योजनेचा रद्द केलेला शासन निर्णय पुनर्जिवीत करणे, १०, २०, ३० लाभाची योजना लागू करणे, सातवा वेतन आयोग लागू झाल्याच्या फरकाची थकबाकी व १४१० विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू करणे. रिक्त पदे भरण्यास मान्यता देणे, २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे अशा अनेक मागण्यांसाठी हा लढा सुरू आहे. न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.
ऐन परीक्षेच्या हंगामात संप पुकारल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. मात्र हा लढा महाविद्यालय, विद्यार्थ्याविरोधात नसून सरकारविरोधात असल्याचे आंदोलकांनी सांगितले.