होळीसाठी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

होळीसाठी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर
होळीसाठी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर

होळीसाठी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर

sakal_logo
By

अलिबाग, ता. १ (बातमीदार)ः चांगल्या सेवा मिळाव्या, प्रवाशांची संख्या वाढावी, यासाठी एसटी महामंडळाकडून वेगवेगळ्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु एसटीचा कारभार आजही जुन्या वेळापत्रकाबरोबरच जुन्या एसटीच्या भरवशावर सुरू आहे. होळीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर आहे. लवकरच रायगड जिल्ह्यातील एसटीच्या ताफ्यात ५० नव्या बस दाखल होणार आहेत. सध्या माणगाव, महाड, व श्रीवर्धनमध्ये १५ बस दाखल झाल्‍याची माहिती विभाग नियंत्रक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
एसटी महामंडळ रायगड विभागाच्या अखत्यारित अलिबाग, पेण, कर्जत, रोहा, मुरुड, माणगाव, श्रीवर्धन, महाड असे आठ एसटी बस आगार असून २० पेक्षा अधिक बस स्थानके आहेत. आगारांतून दररोज सुमारे ४८० बस धावतात. त्यात शिवशाही, निमआराम, साध्या बसचा समावेश आहे. दिवसाला एक लाख किलो मीटरचा प्रवास एसटीचा होतो. यातून सुमारे ३० लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. एसटीचे उत्पन्न वाढवण्याबरोबरच प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाच्या वतीने वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. त्यात विना थांबा प्रवासावर अधिक भर दिला जात आहे. प्रवासी संख्या वाढविण्यासाठी वेगवेगळ्या सणांबरोबरच यात्रांच्या दिवशी जादा बस सोडल्या जातात. परंतु काही आगारांतून चालवल्‍या जाणाऱ्या बस जुनाट झाल्‍याने वारंवार नादुरुस्‍त होतात. पावसाळ्यात बसला गळती लागणे, खिडक्या तुटलेल्या, आसनाची अवस्था बिकट अशा अनेक समस्यांमुळे एसटीतून प्रवास करणे नकोसे वाटते. त्यामुळे अनेक प्रवासी खासगी वाहनांचा आधार घेत आहेत. या प्रवाशांसाठी लवकरच खुशखबर असून जिल्ह्यात लवकरच ५० बस दाखल होणार आहेत. आरामदायी आसनव्यवस्‍था, मोबाईल चार्जिंगची सोय यात असेल.
जिल्ह्यातील माणगाव, महाड व श्रीवर्धन या तीन आगारात सध्या १५ नवीन एसटी बस दाखल झाल्या आहेत. त्‍यामुळे लवकरच प्रवाशांना सुखकर व आरामदायी प्रवासाचा लाभ घेता येईल.

नव्या एसटीमध्ये खासगी चालक
रायगड जिल्ह्यात नव्याने १५ एसटी बस दाखल झाल्या आहेत. टाटा कंपनीच्या या बसमध्ये चालक कंत्राटी आहेत. एसटी महामंडळमध्ये कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या चालकांना मान्यता देण्यात आली असून सध्या २४ चालक पात्र ठरवण्यात आले असून १५ जणांना नियुक्ती दिली आहे. या चालकांना त्यांचे वेतन एजन्सीद्वारे देण्यात येणार आहे. एसटीची दुरुस्ती व डिझेलचा खर्चदेखील एजन्सीद्वारे केला जाणार आहे. नवी एसटी जितके किलो मीटर धावेल, त्यानुसार, दर दिवशी प्रति किलो मीटर ४२ रुपये प्रमाणे ४०० किलो मीटर अंतराचे पैसे एजन्सीला एसटी महामंडळ देणार आहे.

जिल्ह्यात ५० नव्या एसटी बस दाखल होणार असून त्‍यातील १५ उपलब्ध झाल्या आहेत. करारानुसार खासगी बस दाखल झाल्या आहेत. या बसवर चालक कंत्राटी व वाहक एसटी महामंडळाचा आहे. नव्या एसटी बस अद्ययावत असल्याने प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा लाभ घेता येईल.
- प्रशांत खरे, विभागीय वाहतूक अधिकारी