आंबा बागायतदारांना अवकाळीचा फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबा बागायतदारांना अवकाळीचा फटका
आंबा बागायतदारांना अवकाळीचा फटका

आंबा बागायतदारांना अवकाळीचा फटका

sakal_logo
By

पाली, ता. ९ (वार्ताहर) : सुधागड तालुक्यात दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि सोमवारी (ता. ६) आलेल्या अवकाळी पावसामुळे आंबापिकाला चांगलाच फटका बसला आहे. यामुळे मोहरांनी बहरलेले व काही ठिकाणी कैऱ्या धरलेले आंबापिक पूर्णत: धोक्यात आले आहे. यामुळे आंबा बागायतदार आर्थिक संकटात सापडले आहेत. तालुका कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत सहा गावांतील सहा हेक्टरवरील आंबापिकाचे नुकसान झाले आहे.
यावर्षी आंब्याला चांगला मोहर आला होता. शिवाय, बऱ्याच ठिकाणी आता कैऱ्यादेखील आल्या होत्या; मात्र अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. जिल्ह्यातील आंबा पिकांवर अवकाळी पाऊस व हवामानातील बदल आदींबाबत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर होणारे नुकसान टाळण्यासाठी आंबा पीक विमा योजना लागू करण्यात यावी, अशी मागणी आंबा बागायतदारांकडून केली जात आहे. आंब्याप्रमाणेच भाजीपाला फळांवरही ढगाळ वातावरणाचा परिणाम झाला आहे.

या वर्षी आंबापीक चांगले बहरले होते. यंदा चांगले उत्पन्न हाती येईल, अशी परिसरातील सर्वच बागायतदार शेतकऱ्यांची अपेक्षा होती. परंतु नैसर्गिक बदलामुळे आता अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. बागायतदारांना बदलत्या हवामानाचा व अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सरकारने नुकसान भरपाई द्यावी.
- संजय घोसाळकर, आंबा बागायतदार, पाच्छापूर

सहा गावांचा अहवाल आला आहे. बारा बागायतदारांचे अंदाजे सहा हेक्टर आंबापिकाचे नुकसान झाले आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजाची माहिती शेतकरी व बागायतदारांना देतो. ज्यांचे कोणाचे नुकसान झाले आहे त्यांनी कृषी विभागाकडे संपर्क साधावा.
- जे. बी. झगडे, तालुका कृषी अधिकारी सुधागड