
सुधागडमध्ये आरोग्याचा प्रश्न लागणार मार्गी
पाली, ता. २७ (वार्ताहर) : श्री राज मेडिकल ॲण्ड हेल्थकेअर सेंटर व ग्रामीण चॅरिटेबल हॉस्पिटलच्या (एशियाटिक चॅरिटेबल ट्रस्ट) माध्यमातून नव्या ३९ बेडच्या हॉस्पिटल वास्तूचा भूमिपूजन समारंभ नुकताच सुधागड तालुक्यातील परळी येथे झाला. या हॉस्पिटलमुळे तालुक्यातील गोरगरीब, गरजू आदींसह स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
हॉस्पिटलचे भूमिपूजन नीलेश मेहता यांच्या हस्ते करण्यात आले. भूमिपूजनप्रसंगी मेहता म्हणाले, तुम्हाला शहराकडे धाव घ्यावी लागणार नाही, एवढे सक्षम व सुसज्ज हॉस्पिटल असणार आहे. सुधागड तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना शहरात उपचार घेणे अशक्य असते, याचा विचार पप्पाजींच्या मनात आल्याने त्यांनी हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेतला. या अत्याधुनिक हॉस्पिटलची पायाभरणी झाल्यामुळे आजचा दिवस सुधागडमधील आरोग्य सेवेसाठी बहुमूल्य ठरणारा आहे.
सध्या सेंटरमध्ये जनरल फिजिशियन, होमिओपॅथी डॉक्टर, दंतचिकित्सक, कान, नाक, घसा; तसेच त्वचारोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ असे विविध क्षेत्रातील डॉक्टर सेवा देत आहेत. या वेळी घोटवडे गावाचे सरपंच यशवंत झोरे, राहुल गायकवाड, संदेश कुंभार आदींनी सेंटरच्या कार्याचे कौतुक केले. या वेळी एशियाटिक चॅरिटेबल ट्रस्टचे ट्रस्टी नितीन अजमेरा, हितेन ठक्कर, श्रीमद राजचंद्र आश्रमचे सर्व ट्रस्टी; तसेच तहसीलदार उत्तम कुंभार, परळी ग्रामपंचायतीचे सरपंच संदेश कुंभार, वऱ्हाड जांभूळपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रद्धा कानडे, पांडुरंग झोरे उपस्थित होते.
रोजगाराची संधी
आधुनिक सुविधा प्राप्त करून देणारे ३९ बेडचे नवे हॉस्पिटल तयार होणार आहे. ज्यामध्ये सर्वप्रकारच्या सेवा-सुविधांचा समावेश असेल. एक स्वतंत्र आपत्कालीन कक्ष आणि समर्पित रुग्णवाहिका सेवाही उपलब्ध असेल. या रुणालयामुळे आजूबाजूच्या गावातील तरुणांना रोजगार आणि करिअरची नवीन संधी निर्माण होईल. यामध्ये वॉर्डबॉय, परिचारिका, लॅब टेक्निशियन यांचा समावेश आहे.