पाली येथे नळाद्वारे पाण्यात अळ्या

पाली येथे नळाद्वारे पाण्यात अळ्या

पाली, ता. १ (वार्ताहर) ः अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. अनेक वर्षांपासून २७ कोटी रुपयांची शुद्ध पाण्याची योजनाही रखडली आहे. त्यामुळे कोणतीही शुद्धीकरणाची प्रक्रिया न होता पाली-अंबा नदीतून थेट शहरात पाणी पुरवठा केला जात आहे. परिणामी अनेकवेळा नळाच्या पाण्यातून अळ्या, शंख, शिंपले, शेवाळ, गाळ व कचरा तर कधी चक्क साप आल्याचे प्रकार घडतात. तसाच प्रकार पुन्हा पाली नगरपंचायत क्षेत्रात घडला असून झाप गावातील काही रहिवाशांच्या घरात पिण्याच्या पाण्यात चक्क अळ्या आढळल्‍या आहेत. त्‍यामुळे पाली शहरात येणारे भाविक व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर दीपेश लहाने यांनी, तालुक्यातील मनसे कार्यकर्‍त्‍यांसह पाली नगरपंचायत, पाली सुधागड तहसीलदार, वैद्यकीय अधिकारी यांना निवेदन दिले. दूषित पाण्याची तपासणी करून अळ्या नक्की कसल्या आहेत, पाण्याच्या टाक्या, पाण्याचे पाईप याची तपासणी करून साफसफाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबत सात दिवसांत अहवाल मिळावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला आहे. मनसेचे सुधागड तालुका अध्यक्ष भावेश बेलोसे, सचिव तेजस परबळकर, प्रतीक आंग्रे आदी या वेळी उपस्थित होते.

पाण्याचे नमुने घेतले असून त्या अळ्या कसल्या आहेत, याची तपासणी करण्यासाठी पाठवले आहे. तसेच पाण्याच्या टाक्या, पाण्याचे पाईप यांची तपासणी करून साफसफाई करण्यास सुरुवात केली आहे.
- विद्या येरूनकर, मुख्याधिकारी, पाली नगरपंचायत

पाली शहराच्या फिल्टर पाण्याच्या कामाचा टीएस भरलेला आहे. तसेच डीपीआरही तयार झाला आहे. फिल्टर पाण्याची फाईल मंत्रालयात पाठवण्यात आली असून त्या संदर्भातील प्रस्ताव आल्यावर तत्काळ जलशुद्धीकरण प्रकल्‍पाचे काम सुरू करण्यात येईल. तत्पूर्वी पाण्याच्या टाक्या पाण्याचे पाईप साफसफाई करण्यास सुरुवात केली आहे.
- प्रणाली शेळके, नगराध्यक्षा, पाली नगरपंचायत

पाली शहरातील पाण्याच्या जलवाहिन्या १९७० मध्ये टाकण्यात आल्या होत्या. सद्यःस्‍थितीत त्‍या जीर्णावस्‍थेत आहेत. त्यामुळे पाण्यातून कीडे येत असल्याचे ही बाब आम्हीही नाकारत नाही. यावर उपाय योजना करण्यासाठी पाली नगरपंचायत माध्यमातून नवीन जलवाहिनीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
- सुधीर भालेराव, सभापती, पाणी पुरवठा, पाली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com