
साळाव पूल आजपासून तीन दिवस बंद
साळाव पूल आजपासून बंद
दुरुस्तीचे काम ५५ टक्के; पावसाळ्यातही सुरू राहणार दुरुस्तीचे काम
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ७ ः अलिबाग आणि रोहा-मुरूड तालुक्यांना जोडणाऱ्या रेवदंडा येथील साळाव पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असून लोड टेस्टिंगसाठी पुलावरील सर्वच वाहतूक गुरुवारपासून (ता. ८) तीन दिवस पूर्णपणे बंद राहणार आहे. ३५ वर्षांपूर्वी बांधलेला हा पूल धोकादायक स्थितीत असल्याचे स्ट्रक्चर ऑडिटमध्ये आढळले. पुलाच्या ११ खांबांपैकी मधले चार खांब कमकुवत असल्याचे आढळल्याने पुलाच्या तातडीने दुरुस्ती करण्यात येत आहे. पुलावरील अवजड वाहतूक यापूर्वीच बंद करण्यात केली आहे.
साळाव पुलाच्या दुरुस्तीचे काम ५५ टक्के झाले असून आणखी काही महिने ते सुरूच राहणार आहे. पाण्याखालील दुरुस्ती, एक्स्पांशन जॉईनिंगचे काम अद्याप शिल्लक आहे. यासाठी पावसाळ्यातही दुरुस्ती केली जाणार असल्याची माहिती अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदवे यांनी दिली. कोळसा वाहतूक करणाऱ्या बार्जने दिलेल्या धडकेने हा पूल अधिकच कमकुवत झाला होता. गतवर्षी झालेल्या स्ट्रक्चर ऑडिटमध्येही तातडीने दुरुस्ती करण्यास सुचवण्यात आले होते. पाच महिन्यापूर्वी पुलाच्या दुरुस्तीचे काम अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केले. दुरुस्ती सुरू असताना ५ टनावरील अवजड वाहतूक यापूर्वीच बंद करण्यात आली आहे, आता तीन दिवसांसाठी सर्वच वाहनांसाठी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
अलिबागमार्गे मुरूडला पर्यायी मार्ग
-अलिबाग ते साळावदरम्यान होणारी अवजड वाहनांची वाहतूक अलिबाग, पोयनाड, वडखळ-नागोठणे, कोलाड-रोहा-साळाव मार्गे अथवा अलिबाग-पेझारी चेकपोस्ट, नागोठणे, कोलाड-रोहा, तळेखार-साळाव मार्गे होईल. दुसरा पर्यायी मार्ग अलिबाग, बेलकडे, वावे-सुडकोली, रोहा-तळेखार-साळावमार्गे आहे.
- मुरूड-अलिबाग दरम्यान होणारी अवजड वाहतूक ही मुरूड-साळाव, तळेखार, चणेरा-रोहा-कोलाड, नागोठणे-वडखळ, पोयनाड-अलिबाग अथवा मुरूड-साळाव-तळेखार, रोहा-कोलाड, नागोठणे-पेझारी चेकपोस्ट-अलिबाग अशी होईल तर दुसरा मार्ग मुरूड-साळाव, तळेखार, रोहा-सुडकोली, वावे-बेलकडे, अलिबाग अशी असेल.
लोड टेस्टिंगचे काम आयएफसी-५१ नुसार होणार असून दरम्यान पुलावरील भार कमी असणे आवश्यक आहे. टेस्टिंगच्या दरम्यान दुर्घटना होण्याची शक्यता असते, हे सर्व टाळण्यासाठी साळाव पुलावर तीन दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीही यास परवानगी दिली आहे.
- राजीव डोंगरे, उप अभियंता, बांधकाम विभाग, अलिबाग