कोर्लईतील ३०० मालमत्तांची चौकशी

कोर्लईतील ३०० मालमत्तांची चौकशी

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १४ : मुरूड तालुक्यातील कोर्लई ग्रामपंचायतीची महत्त्वाची कागदपत्रे गहाळ करून काही संवेदनशील विषय दडपण्याचा प्रकार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी मुरूड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. दोन दिवसांपासून कोर्लई ग्रामपंचायतीची चौकशी सुरू आहे. बुधवारी (ता. १४) कोर्लई येथील ३०० मालमत्तांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात आले.

मालमत्ता नोंदवहीतील खोडाखोड, चुकीच्या पद्धतीने घरपट्टी लावणे असे प्रकार झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे २००५ ते २०२२ पर्यंतचे सर्व दप्तर तपासले जाणार आहे. यातील काही कागदपत्रे यापूर्वीच गहाळ झाली आहेत. ग्रामपंचायतीचा कार्यभार हाती घेताना ही कागदपत्रे उपलब्ध झाली नसल्याचे ग्रामसेवकाने मुरूड पोलिसांना लेखी कळवले आहे. जून २०११ ते नाव्हेंबर २०१७ या कालावधीतील मासिक सभा इतिवृत्त उपलब्ध नसल्याचे त्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. या प्रकाराची गंभीर दखल जिल्हा परिषद प्रशासनाने घेतली आहे. याची कसून चौकशी करावी, असे आदेश जिल्हा परिषदेच्या सीईओंनी मुरूड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण लावून धरले आहे. ठाकरे कुटुंबीयांच्या कथित १९ बंगल्यांची माहिती उद्धव ठाकरे यांनी निवडणूक शपथपत्रात लपवल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. येथील जमिनीवर १९ बंगले असल्याची नोंद ग्रामपंचायतीच्या दप्तरी आहे. त्याची घरपट्टीदेखील भरली गेली आहे. कोर्लई ग्रामपंचायतीच्या दप्तरात खाडाखोड केल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. सुरू झालेल्या चौकशीतून आणखी काही मालमत्तांच्या चुकीच्या नोंदी सापडण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांविरोधात सरकारी कागदपत्रात खाडाखोड केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कोर्लई ग्रामपंचायतीने ज्या मिळकतींमध्ये बांधकामाची परवानगी दिली आहे, त्यांची सर्व माहिती गोळा करावी, विनापरवाना झालेल्या बांधकामांचीदेखील माहिती गोळा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

***
सध्या माहिती संकलनाचे काम सुरू आहे. यात कोणती माहिती चुकीची, कोणती बरोबर आहे, याची पडताळणी केल्यानंतरच प्रकरणाची सत्यता समजू शकणार आहे. २००५ पासूनचे दप्तर तपासले जात आहे. त्याचबरोबर मालमत्ता नोंदवहीत असलेल्या नोंदी आणि प्रत्यक्ष मालमत्ता यांचे सर्वेक्षण केले जात आहे.
- डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com