प्रशासनाकडून २५६ धोकादायक इमारतींना नोटिसा

प्रशासनाकडून २५६ धोकादायक इमारतींना नोटिसा

Published on

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १८ : पावसाळ्यात जुन्या, मोडकळीस आलेल्‍या इमारती कोसळण्याचा धोका अधिक असतो, या दुर्घटना टाळण्यासाठी रायगड जिल्ह्यातील शहरी भागात धोकादायक इमारतीचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्‍यात तब्बल २५६ इमारती धोकादायक असल्याचे आढळून आले. यापैकी ७३ इमारती अतिधोकादायक स्थितीत आहेत. ही बाब लक्षात घेऊन धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींच्या मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून येथील रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे आदेश नगरपालिका प्रशासनाने दिले आहेत.
शहरी भागात जीर्ण झालेले जुने वाडे, मोडकळीस आलेल्या इमारती खूप आहेत. यातील काही इमारती वापराविना आहेत, यात १० सरकारी इमारतींचाही समावेश आहे. इमारती कोसळून दुर्घटना टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. महाड येथे तारीख गार्डन ही इमारत २४ ऑगस्ट २०२० ला इमारत कोसळून १६ जणांचा मृत्यू झाला होता. अतिवृष्टी आणि निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे ही इमारत कोसळली होती. या दुर्घटनेची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाच्या वतीने दरवर्षी पावसाळ्यापूर्वी धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचे सर्वेक्षण केले जाते. यानंतर या इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे निर्देश दिले जातात.

इमारत मालकांना नोटिसा
जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतींना धोकादायक इमारती आणि धरणांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. या ११ नगरपालिका आणि ५ नगरपंचायतीमधील सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. यात १८३ धोकादायक तर ७३ अतिधोकादायक इमारती असल्याचे समोर आले आहे. उरण, खोपोली, पेण, महाड, अलिबाग येथील धोकादायक इमारतींची संख्या मोठी आहे. या सर्व इमारतींमधील रहिवाशांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यानुसार इमारतींमधील रहिवाशांना तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्यास सांगण्यात आले आहे.

धोकादायक इमारतींची संख्या वाढणार
जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी निर्देशानंतरही श्रीवर्धन नगरपालिका खालापूर, पाली नगरपंचायतींनी अद्याप आपले अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केलेले नाहीत. त्याचबरोबर सादर झालेल्या अहवालात ग्रामपंचायत क्षेत्रातील इमारतींचा समावेश नाही. रेवदंडा, सासवणे, दिवेआगर, नांदगाव यासारख्या ग्रामपंचायतीमध्येही धोकादायक इमारती आहेत.

शहर-धोकादायक -अतिधोकादायक
अलिबाग /१७/ २५
उरण /५०/ २०
कर्जत /८/ ०
खोपोली /३६/ २
पेण /२९/ १३
महाड /२३/ १३
माथेरान /६/ ०
मुरुड जंजिरा /७/ ०
म्हसळा /५/ ०
रोहा /६/ ०
तळा /२/ ०
पोलादपूर /२/ ०
एकूण /१९१/७३

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.